तालिबानकडून अफगाणिस्तानातील महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या अनेक घटना ताज्या असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तालिबान्यांनी घोर प्रांतात एका गर्भवती अफगाणी पोलीस महिलेला त्यांच्या कुटुंबासमोरचं गोळ्या मारून ठार केलं आहे. बानो निगारा यांना तिचा पती आणि मुलांसमोर फिरोजकोह येथील तिच्या घरी मारण्यात आल्याचं वृत्त आहे. “पोलीस अधिकारी निगारा यांना तिची मुलं आणि पती यांच्यासमोर ४ सप्टेंबर रात्री १० वाजता घोर प्रांतात गोळ्या घालून ठार करण्यात आलं. निगारा या ६ महिन्यांची गरोदर होत्या”, असं वृत्त अफगाणिस्तानचे आघाडीचे पत्रकार बिलाल सरवारी यांनी रविवारी (५ सप्टेंबर) निगारा यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या हवाल्याने ट्विटच्या माध्यमातून दिलं आहे.  मात्र, तालिबानने निगारा यांच्या हत्येत आपला कोणताही सहभाग नसल्याचं म्हटलं आहे.

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी बीबीसीला सांगितलं की, “तालिबानने निगारा यांची हत्या केलेली नाही. मात्र, आमची चौकशी सुरू आहे.” दरम्यान, या घटनेच्या साक्षीदारांनी बीबीसीला सांगितलं की, तालिबान्यांनी शनिवारी (४ सप्टेंबर) निगारा यांना पती आणि मुलांसमोर तिला मारहाण केली आणि गोळी मारली. इतर लोक सूडाच्या भीतीने बोलण्यास तयार नव्हते. यावेळी बीबीसीला माहिती दिलेल्या एका साक्षीदारानुसार, त्या दिवशी आलेले ते तीन बंदूकधारी अरबी भाषेत बोलत होते. दरम्यान, सोशल मीडियावरील फोटोमध्ये निगारा यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसत असून त्यांचा चेहरा विद्रुप करण्यात आला आहे.

हक्कांसाठी केलेल्या मागणीनंतर घडली ‘ही’ घटना

घोर येथील एका नागरी कार्यकर्त्याने एटिलात्रोजला (Etilaatroz)सांगितलं की, हा परिसर तालिबानच्या ताब्यात येण्यापूर्वी निगारा या प्रांतीय कारागृहात कार्यरत होत्या. असंही सांगितलं जात आहे कि, एक महिला कार्यकर्त्या नर्गिस सद्दत या तालिबानच्या अधिपत्याखाली राजकीय हक्क मिळवण्यासाठी काबूलमध्ये झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांचा असा आरोप होता कि तालिबान्यांकडून त्यांना मारहाण झाली आहे. एका व्हिडीओमध्ये सद्दत यांच्या चेहऱ्यावरून रक्त वाहताना दिसत आहे. या प्रकारानंतर आता पोलीस अधिकारी निगारा यांची हत्या करण्यात आली आहे.

संरक्षणाचं आश्वासन आणि अत्याचारांची मालिका

असंही सांगितलं जातं की, तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेत हक्क आणि प्रतिनिधीत्वाच्या मागणीसाठी डझनभर अफगाण महिलांनी हेरातमध्ये निदर्शनं केल्यानंतर काही दिवसांनी या महिला पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली आहे. एकीकडे, तालिबानचं असं म्हणणं आहे की, ते महिलांच्या हक्कांचं रक्षण करतील आणि सर्वसमावेशक सरकार निर्माण करतील. तर दुसरीकडे, सद्यस्थितीत तालिबान्यांकडून देशभरात केल्या जाणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत.