दहिसरमधील ४० एकर जागा कारशेडसाठी

मुंबई मेट्रोसाठी दहिसरमधील भारतीय विमानतळ प्राधिकरणाची ४० एकर जागा राज्य शासनाला देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्याने मेट्रोसाठी कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. या जागेच्या बदल्यात राज्य शासन प्राधिकरणाला गोराईतील जागा देणार आहे. जागांच्या अदलाबदलीमुळे केंद्र व राज्य शासनाच्या यंत्रणांचा फायदाच होणार आहे.

मुंबईत शासनाच्या वतीने मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. दहिसर परिसरात सुरू होणाऱ्या किंवा भविष्यात मीरा-भाईंदपर्यंत विस्तार करण्याची योजना असलेल्या मेट्रोच्या कारशेडकरिता जागा उपलब्ध होत नव्हती. या परिसरात भारतीय विमानतळ प्राधिकरणाची ६४ एकर जागा आहे. या जागेत संदेशवहन  यंत्रणा आहे. पण आसपास उंच इमारती उभ्या राहिल्याने संदेशवहन यंत्रणेत अडथळा येत होता. तसेच काही जागांवर अतिक्रमणेही झाली आहेत. मेट्रोसाठी ही जागा मिळावी म्हणून महाराष्ट्र सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार हवाई वाहतूक मंत्रालयाने तत्त्वत: मान्यता दिली होती. तसेच केंद्र व राज्यात करारही झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहिसर येथील ४० एकर जागा मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाला देण्यास मान्यता देण्यात आली. या जागेत कारशेड उभारणे शक्य होईल. या बदल्यात गोराईतील ४० एकर जागा विमानतळ प्राधिकरणाला देण्यात येणार आहे. ही जागा मोकळी असल्याने विमानतळ प्राधिकरणाला संदेशवहन यंत्रणा उभरणे शक्य होईल. दहिसरमधील जागा हस्तांतरणासाठी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाला केंद्र सरकारला ४७२ कोटी रुपयांची रक्कम द्यावी लागेल. तसेच गोराई येथील जागा विमानतळ प्राधिकरणाला हस्तांतरित करताना सपाटीकरण करून द्यावी लागेल अशा अटी घालण्यात आल्या आहेत. दहिसर येथील काही जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे मोकळी असलेली ४० एकर जागाच राज्याने ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली. दहिसरमधील जागेचा ताबा मिळाल्यावर मेट्रोचे काम मार्गी लागू शकेल.