लैंगिक अत्याचाराची तक्रार मागे न घेतल्याने २३ वर्षीय दलित विद्यार्थिनीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सेओनी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. तरुणी कॉलेजला जात असताना आरोपीने तिला रस्त्यात गाठलं आणि केसांना धरुन खेचत नेऊन दगडाने ठेचून हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस ठाण्यात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी वारंवार तरुणीवर दबाव आणत होता असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी नेताजी सुभाषचंद्र बोस सरकारी कॉलेजात शिकत होती. कॉलेजला जात असतानाच हा प्रकार घडला. आरोपी ३८ वर्षीय अनिल मिश्रा याने रस्त्यात तरुणीला गाठत आपली दुचाकी थांबवली. यानंतर त्याने तरुणीचे केस धरत रस्त्याशेजारी ओढत नेलं. तिला धक्का देऊन खाली पाडण्यात आलं आणि जवळच असणारा दगड डोक्यात घातला अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी अरविंद जैन यांनी दिली आहे.

घडलेला प्रकार पाहून तिथे उपस्थित काही लोकांनी धाव घेत आरोपी अनिल मिश्राला पकडलं. तरुणीला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. आरोपी अनिल मिश्राला पोलिसांनी अटक केली असून प्राथमिक तपासात त्याने तक्रार मागे न घेतल्यानेच हत्या केल्याचं समोर येत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.