दिल्लीत वकील आणि पोलिसांमध्ये निर्माण झालेल्या संघर्षादरम्यान एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पोलीस उपायुक्त मोनिका भारद्वाज यांना पाठलाग करुन वकिलांनी मारहाण केल्याचं दिसत आहे. २ नोव्हेंबर रोजी तीस हजारी न्यायालयाच्या आवारात हा सगळा प्रकार घडला. विशेष म्हणजे यावेळी हिंसाचार सुरु असताना पोलीस उपायुक्त मोनिका भारद्वाज वकिलांना हात जोडून हिंसा थांबवा अशी विनंती करत होत्या. मात्र वकिलांनी त्यांचं काहीही ऐकून घेता त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

व्हिडीओत वकिल मोठ्या संख्येने मोनिका भारद्वाज यांच्यावर धावून जातान दिसत आहेत. यावेळी काहीजणांनी मोनिका भारद्वाज यांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यास मदत केली. याआधी पाच मिनिटांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ज्यामध्ये मोनिका भारद्वाज यांना घटनास्थळी उपस्थित वकिलांनी मारहाण केल्याचं सांगण्यात आलं होतं.

यावेळी मोनिका भारद्वाज यांच्या खासगी सुरक्षा अधिकाऱ्याची सर्व्हिस रिव्हॉल्वर पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही उघड झालं आहे. ही ऑडिओ क्लिप तीस हजारी न्यायालयाच्या आवारात झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याची होती. झालेल्या प्रकारामुळे मोनिका भारद्वाज यांना खूप मोठा धक्का बसला असून, बराच वेळा त्या रडत होत्या असंही त्यांनी सांगितलं आहे.

२ नोव्हेंबर रोजी तीस हजारी न्यायालयाच्या आवारात पार्किंगच्या मुद्द्यावरुन पोलीस आणि वकिलांमध्ये बाचाबाची झाली ज्याचं रुपांतर नंतर हिंसाचारात झालं. हिंसाचार इतक्या मोठ्या प्रमाणात होता की, एक वकील गोळी लागून जखमी झाला होता. तर दुसरीकडे २० पोलीस कर्मचारी ज्यांच्यात काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यांना गंभीर जखमा झाल्या. आठ वकील जखमी झाले. १२ दुचारी, एक पोलीस क्यूआरटी वाहन आणि आठ कारागृह व्हॅनचं नुकसान झालं अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.