सानिया मिर्झा हे टेनिसच्या जगातील नाव सर्वांच्या परिचयाचे आहे. भारतातील टेनिस जेव्हा लिएंडर पेस आणि महेश भूपतीपुरते मर्यादित होते, महिला टेनिसमध्ये भारत कुठेच नव्हता, त्यावेळी सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी केली. सानियाच्या जबरदस्त ‘सर्विस’मुळे आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये सानिया भारताचा चेहरा बनली. अगदी अनेकांनी त्यांच्या घरात जन्मणाऱ्या मुलींचे नावदेखील सानिया ठेवले. मात्र भारतीयांना इतकी सुपरिचित असणारी सानिया दूरदर्शनच्या सह्याद्री या सरकारी वाहिनीला माहित नसल्याचे दिसते आहे. कारण सानिया मिर्झा टेनिसपटू नव्हे, तर बॅडमिंटनपटू आहे, अशी माहिती सह्याद्री वाहिनीने दिली आहे.

सानिया मिर्झा बॅडमिंटनपटू आहे, इतकीच माहिती सह्याद्रीने दिलेली नाही. तर सानिया मिर्झाने ब्रिस्बेनमधील दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याचे ‘महत्त्वपूर्ण’ वृत्त सह्याद्रीने दिले आहे. रविवारी दुपारी २.३० ते ३ च्या दरम्यान दूरदर्शनच्या सह्याद्रीने सानियाबद्दलची बहुमूल्य माहिती टिकरवरुन दिली. सह्याद्रीने दिलेले हे वृत्त पाहून अनेक क्रीडाप्रेमींना विशेषत: सानिया मिर्झाच्या चाहत्यांना धक्का बसला.

सानिया मिर्झाने ब्रिस्बेनमध्ये बॅडमिंटन स्पर्धेच्या दुहेरी गटात विजेतेपद पटकावल्याचे वृत्त सह्याद्री वाहिनीवर वाचताच काहींनी सह्याद्री वाहिनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ‘त्यांनी अर्धा तास ते वृत्त टिकरमध्ये चालवले. कहर म्हणजे त्यांच्या सूत्रसंचालकानेदेखील बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावल्याचे वृत्त वाचून दाखवले. ही प्रचंड मोठी चूक आहे. मात्र ती चूक त्यांच्याकडे असणाऱ्या कोणालाच समजली नाही, हे आश्चर्यकारक आहे,’ असे बसंत मोरवाल नावाच्या व्यक्तीने म्हटले.

‘मी सानिया मिर्झाची चाहती आहे. डीडी सह्याद्रीने दाखवलेले वृत्त वाचून मी चकीत झाले आणि सानिया बॅडमिंटन कधी खेळू लागली, याचा विचार करु लागले,’ असे पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या ऋतुजा मरळेने म्हटले. ‘आम्हाला या चुकीची कल्पना नव्हती. मात्र चूक लक्षात येताच ती दुरुस्त करण्यात आली,’ अशी माहिती डीडी न्यूजचे संचालक सुदर्शन पानतोडे यांनी दिली.