बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या सुरुंगाचा स्फोट होऊन त्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान जखमी झाला असून तो जिवंत आहे. दूरचित्रवाणीवरून करण्यात येणाऱ्या प्रक्षेपणात सीआरपीएफचा डेप्युटी कमांडंट इंद्रजीत सिंग असल्याचे म्हटले असले तरी ते सोमवारीच मरण पावल्याचे सीआरपीएफ प्रमुख दिलीप त्रिवेदी यांनी स्पष्ट केले आहे.
दूरचित्रवाणीवरून दाखविण्यात येणारी व्यक्ती सीआरपीएफचा जवान दिलीप असून त्याला पाटण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे आणि तो जिवंत आहे. सीआरपीएफचे कमांडंट इंद्रजीत सिंग दुर्दैवाने मरण पावले आहेत, असे त्रिवेदी यांनी सांगितले. दूरचित्रवाणीवरून दाखविण्यात येणारी व्यक्ती इंद्रजीत सिंग असल्याचे सांगण्यात येत असल्याने आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला, असेही ते म्हणाले.
जखमी अवस्थेतील जवान दिलीप हा पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे मदतीची याचना करीत असल्याचे फुटेज प्रक्षेपित करण्यात आले. आपल्या जवळपास डॉक्टर नाही, आपण मरणार आहोत, रक्तप्रवाह थांबत नाही आहे, आपल्याला लहान मुले आहेत, दोन तास उलटूनही हेलिकॉप्टर पाठविण्यात आले नाही, सुरुंगाच्या स्फोटात आपण जखमी झालो आहोत, असा आक्रोश दिलीप करीत असल्याचे फुटेजमध्ये दाखविण्यात आले.