शालेय विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या माध्यान्ह भोजन प्रक्रियेसंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील मुज्जफरनगर येथील जनता इंटर कॉलेज पचेंडा येथे मुलांना देण्यात आलेल्या माध्यान्ह भोजनात चक्क एक मृत उंदीर आढळून आला. एवढेच नाहीतर तेच जेवण मुलांनी खाल्यांनी नऊ विद्यार्थ्यांची प्रकृती देखील खालावली असल्याची माहिती मिळाली आहे.

यावरून प्रशासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत कितपत गंभीर आहे, हे दिसून आले. मुलांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालायात दाखल करण्यात आले. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. एकूण दहाजणांवर रुग्णालायात उपचार सुरू आहेत.  माध्यान्ह भोजन वाटपाचे काम एका स्वयंसेवी संस्थेला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या स्वयंसेवी संस्थेच्या एका कर्मचाऱ्यांनी हे जेवण एका शिक्षकासह नऊ विद्यार्थ्यांना दिले. यानंतर एका मुलाच्या जेवणात मृत उंदीर आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली. यानंतर तात्काळ हे जेवण विद्यार्थ्यांकडून काढून घेण्यात आले. मात्र काही विद्यार्थ्यांनी तोपर्यंत हे हे अन्न खाल्याने त्यांना उलटीचा त्रास सुरू झाला होता. अखेर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अमित कुमार सिंह यांनी  चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.