दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं दिल्लीतील झोपड्या तोडण्याच्या निर्णयावरुन भाजपावर हल्लाबोल केला आहे. अरविंद केजरीवाल जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत कोणीही कोणाचीही घरं तोडू शकत नाही, असं आपनं म्हटलं आहे. तसंच गरज भासल्यास या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्यात येणार असल्याचं आपनं स्पष्ट केलं आहे.

“भाजपाकडून झोपड्यांवर त्या तोडण्यात येणार असल्याच्या नोटीस लावत आहे. या नोटीस माणुसकी आणि संविधानाच्या विरोधातील आहेत. जो पर्यंत अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत कोणाचंही घर तोडू दिलं जाणार नाही याचं आश्वासन देतो,” असं आम आदमी पक्षाचे नेके राजीव चड्ढा म्हणाले. दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं.

“ही नोटीस मी फाडत आहे आणि तुमचा मोठा मुलगा अरविंद केजरीवाल तुमच्यासाठी कायम आहे हे मी तुम्हाला सांगतो. ते तुमचं घर जमिनदोस्त होऊ देणार नाहीत. झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या हितांच्या रक्षणासाठी केजरीवाल कायम उभे राहतील आणि काहीही करावं लागलं तरी घर पाडू देणार नाही,” असंही त्यांनी नमूद केलं. सध्या अशा एका योजनेवर काम सुरू आहे जी आल्यानंतर झोपड्या कोणीही पाडू शकणार नसल्याचंही ते म्हणाले. दिल्लीत रेल्वे रूळांनजीक असलेल्या ४८ हजार झोपड्या हटवण्याचे आदेश नुकतेच न्यायालयानं दिले होते. आवश्यकता भासल्यास सर्वोच्च न्यायालयातही दाद मागू आणि रस्त्यावरही उतरण्यास आपण तयार असल्याचं चड्ढा म्हणाले.

न्यायालयीन लढाई नाही

“दिल्ली सरकारनं ४८ हजार झोपडपट्टीवासीयांसाठी कोणतीही न्यायालयीन लढाई लढली नाही. आता जेव्हा ते राजीव रतन आवास योजनेअंतर्गत रिकाम्या असलेल्या ५० हजारांपेक्षा अधिक घरांद्वारे झोपडपट्टीवासीयांना मदत करू शकतात, अशा परिस्थितीत राघव चड्ढा यांसारख्या नेत्यांकडून त्यांची दिशाभूल केली जात आहे. आपच्या नेत्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर राजकारण करणं बंद करावं,” असं मत दिल्ली भाजपाचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी व्यक्त केलं.