आम आदमी पक्षाचे (आप) निलंबित नेते कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. या दोघांमधील वादाने आता नाट्यमय वळण घेतले आहे. आतापर्यंत शाब्दिक हल्ला करत असलेले कपिल मिश्रांनी शुक्रवारी आपल्या समर्थकांना घेऊन केजरीवाल यांचे जनता दरबार गाठले. मिश्रा यांनी केजरीवाल यांच्या घरासमोर समर्थकांबरोबर भजन-कीर्तन सुरू केले.

कपिल यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारमध्ये जाऊन त्यांच्या घोटाळ्यांची पोलखोल करणार असल्याचे जाहीर केले होते. शुक्रवारी सकाळी कपिल मिश्रा हे आपल्या काही समर्थकांसह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांना ७ लोकांसह आत सोडण्याची परवानगी देण्यात आली होती. पण त्यांनी आपल्याबरोबर आलेल्या २० समर्थकांसह आत जाण्याचा आग्रह धरला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही. त्यानंतर पोलीस आणि मिश्रा समर्थकांमध्ये वाद झाला. आत जाण्यासाठी ते बॅरिकेड्सवर चढले. तेथेच जमिनीवर बसून कीर्तन सुरू केले. ‘अब तो कुर्सी छोड़ो केजरीवाल…’, ‘रघुपति राघव राजा राम…’ हे भजन म्हणण्यास त्यांनी सुरूवात केली. मिश्रांचे समर्थक तेथे ढोल वाजवत भजन-कीर्तन म्हणत आंदोलन करत आहेत.

मंत्रिपदावरून हटवल्यानंतर कपिल यांनी केजरीवाल यांच्यावर कठोर शब्दांत टीका करण्यास सुरूवात केली. अनेक पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनी मंत्री सत्येंद्र जैन यांची पदवी बनावट असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कपिल मिश्रा यांची विश्वसनीयता राहिली नसल्याचे पक्षाचे संस्थापक सदस्य रवी श्रीवास्तव यांनी ‘टाइम्स नाऊ’शी बोलताना सांगितले.