दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर, भारतीय जनता पार्टीने दिल्लीच्या नेतृत्वात मोठा बदल केला आहे. खासदार मनोज तिवारी यांची दिल्ली भाजपा अध्यक्षपदावरुन उचलबांगडी करत, त्यांच्या जागेवर आदेश कुमार गुप्ता यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ही नेमणूक केली आहे.

या नेमणुकीनंतर मनोज तिवारी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांचे आभार मानले आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्व कामांबद्दल मी आभारी आहे. दिल्लीवासियांनी मला जे प्रेम दिलं याबद्दल मी कायम ऋणी राहीन. माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा अशा शब्दांत मनोज तिवारी यांनी दिल्लीकरांचे आभार मानत गुप्ता यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

याआधी महापौर राहिलेले आदेश गुप्ता यांचा दिल्लीच चांगला संपर्क असल्याचं मानलं जात. अनेक व्यापारी वर्गाशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. दिल्लीत अधिकाधीक भागात पक्षाचा विस्तार करण्याचा मानस गुप्ता यांनी बोलून दाखवला. यावेळी बोलत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करोनामुळे निर्माण झालेली परिस्तिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीकाही गुप्ता यांनी केली. दिल्ली सोबतच जे.पी.नड्डा यांनी छत्तीसगड भाजपा अध्यक्षपदी विष्णूदेव साई तर मणिपूर भाजपा अध्यक्षपदी प्रो. टिकेंद्र सिंह यांची नेमणूक केली आहे.