नवी दिल्ली : दिल्लीतील बुराडी वसाहतीत ११ जणांचा गूढ मृत्यू झाल्याच्या प्रकरणात संबंधितांच्या नातेवाइकांनी आत्महत्येची शक्यता फेटाळली असून, या अकरा जणांचा खून करण्यात आल्याचा आरोप केला आहे. नातेवाइकांनी सांगितले, की भाटिया कुटुंबीय हे गेल्या महिन्यात साखरपुडा झालेल्या प्रियंकाच्या विवाहाची तयारी करीत होते. तिचाही मृतांत समावेश आहे.

दरम्यान, पोलीस या प्रकरणी  तपास करीत असून १५ ते ७७ वयोगटांतील ११ जणांनी आत्महत्या करारानुसार मोक्ष मिळवण्याच्या उद्देशातून हा प्रकार केल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या हस्ताक्षरातील नोंदीही सापडल्या आहेत, त्यामुळे त्यात धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनही आहे. हस्ताक्षरातील नोंदीत मानवी शरीर हे तात्पुरते असून मृत्यूच्या भीतीवर डोळे व तोंड बांधून मात करता येते असे म्हटले होते. यात मरण पावलेल्या नारायणी देवी यांच्या कन्या सुजाता नागपाल यांनी सांगितले, की माध्यमे यात चुकीचे अंदाज करीत असून, आत्महत्येचे कारण असल्याचे पसरवत आहेत. मी आईशी रोजच बोलत होते. सगळे काही व्यवस्थित चालले होते. आमचे कुटुंब सुशिक्षित होते.

बाबाबुवांवर आमचा विश्वास नाही त्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार नाही. माध्यमे मात्र चुकीची माहिती पसरवत आहेत. नारायणी देवी यांची पुतणी गीता ठकराल हिने सांगितले, की बाहेरील कुणीतरी हा सगळा प्रकार केला आहे. दुसरे नातेवाईक मनोज भाटिया यांनी सांगितले, की आम्हाला धक्का बसला आहे. धार्मिक विश्वासाचा अतिरेक आमच्यात नव्हता, त्यामुळे या कारणांवर आमचा विश्वास नाही.