दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वो अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान भाजपा कार्यकर्त्यांना लायकीत राहण्याचा सल्ला दिला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी वाकड्यात शिरू नये. त्यांनी जर दिल्लीच्या जनतेशी वाकडे घेतले तर असे जोडे पडतील की ते आपले तोंडही दाखवू शकणार नाहीत. बवानातील सात वसाहतीत पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचे उद्घाटन करण्यासाठी गेल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उपस्थित होते, अशी माहिती माध्यमांत येत आहे.

केजरीवाल कार्यक्रमस्थळी दाखल होताच भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंड दाखवले. केजरीवाल यांनी बवाना नरेला येथे येणारी मेट्रो रद्द केल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला. मेट्रो रद्द केल्यामुळे येथील लोक विकासापासून दुरावले आहेत, असे भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. केजरीवाल भाषण देत असताना भाजपा कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. त्याचदरम्यान, केजरीवाल यांनी भाजपाला इशारा दिला. लायकीत राहा..दिल्लीतील जनतेशी वाकडे घेऊ नका..असे जोडे पडतील तुमच्यावर की तुम्ही तुमचा चेहराही पाहू शकणार नाही, असे इशारा त्यांनी भाषणातून दिला.

तत्पूर्वी त्यांनी आपल्या भाषणात नायब राज्यपालांवरही टीका केली. दिल्लीत सीसीटीव्ही लावण्याची फाईल नायब राज्यपालांनी अडवून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. जर त्यांनी या फाईलला लवकर हिरवा कंदील दाखवला नाही तर संपूर्ण दिल्ली त्यांच्या घरी जाईन, असा इशारा दिला.

दिल्लीत लवकरच १५० मोहल्ला क्लिनिक सुरू होणार आहेत. येथे सर्व आजारावर उपचार आणि चाचण्या मोफत होतील. आतापर्यंत १५० मोहल्ला क्लिनिक सुरू झाले असून आणखी १५०० लवकरच सुरू होतील. हे मोहल्ला क्लिनिक मागील वर्षीच सुरू झाले असते. पण भाजपाच्या नायब राज्यपालांनी दीड वर्षांपर्यंत फाईल अडवून ठेवली होती, अशी माहिती देत, राजकारण करा पण जनतेविरोधात करू नका. नाहीतर जनता तुम्हाला सोडणार नाही. तुमचा चेहरा बिघडवून टाकेल. मोहल्ला क्लिनिकला अडथळे आणणाऱ्या भाजपाला लाज वाटली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.