दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मंगळवारी दुपारी एका व्यक्तीने मिरची पूड फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्ली सचिवालयात ही घटना घडली असून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मिरची पूड फेकणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. अनिल शर्मा असे या तरुणाचे नाव असून तो दिल्लीतील रहिवासी आहे.

दिल्ली सचिवालयात मंगळवारी दुपारी एक तरुण पोहोचला. त्याने केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली. या प्रकारानंतर सचिवालयात तैनात असलेल्या पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्या तरुणाने केजरीवाल यांना धक्काबुक्की केली असून त्याने केजरीवाल यांच्यावर गोळीबार करण्याचीही धमकी दिल्याचे समजते. केजरीवाल यांच्या डोळ्यात मिरचीपूड गेल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी मिरचीपूड फेकणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. अनिल शर्मा असे या तरुणाचे नाव असून त्याची चौकशी सुरु आहे.

पाहा व्हिडिओ

अनिल शर्मा हा सचिवालयाच्या आत मिरची पावडर घेऊन कसा पोहोचला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा भेदण्यात तो यशस्वी झाल्याने दिल्ली पोलिसांच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाला आहे. यापूर्वी त्यांच्यावर शाईफेक, चप्पल फेकल्याचा प्रकारही घडला होता.

आम आदमी पक्षाचे माजी नेते कपिल मिश्रा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ‘राजकारणात हिंसाचाराचे समर्थन कधीच करता येणार नाही. मात्र, निवडणूक जवळ आल्या की केजरीवाल यांच्यावर असे हल्ले होतात’, असे सूचक विधान करत त्यांनी या हल्ल्यावर शंका उपस्थित केली आहे.