दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आंदोलन गेल्या आठ दिवसांपासून सुरु आहे. नायब राज्यपालांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या या आंदोलनावरून आता दिल्ली हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांना झापले आहे. तुम्ही तुमचे आंदोलन एखाद्या घरात किंवा कार्यालयात कसे काय करू शकता? तुमचे आंदोलन सुरु करण्यापूर्वी तुम्ही नायब राज्यपालांची परवानगी घेतली होती का? असे प्रश्न विचारत दिल्ली हायकोर्टाने अरविंद केजरीवाल आणि इतर मंत्र्यांना झापले आहे.

अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी भाजपाचे आमदार विजेंदर गुप्ता यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने केजरीवाल आणि इतर मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्यासोबतचे मंत्री यांच्या आंदोलनाचा हा आठवा दिवस आहे. सनदी अधिकाऱ्यांच्या कथित संपावरून हे आंदोलन सुरु झाले आहे. गेल्या सोमवारपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे मंत्री आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून सनदी अधिकारी संपावर गेले आहेत असा आरोप केजरीवाल यांनी केला.

दरम्यान सनदी अधिकाऱ्यांच्या संघटनेने रविवारी पत्रकार परिषद घेऊन आम्ही कोणताही संप पुकारला नसल्याचे म्हटले आहे. तसेच आम्ही आमचे काम व्यवस्थित करतो आहोत. आमच्या विरोधात अपप्रचार केला जातो आहे असाही आरोप सनदी अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला.