सर्वसामान्य माणसांच्या खात्यातून ऑनलाईन पद्धतीने पैसे लंपास करण्याच्या घटना अनेकवेळा ऐकायला मिळतात. पण, मुख्यमंत्र्यांच्याच मुलीला गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी OLXवर सोफा विकत होती. यावेळी कस्टमर असल्याचे भासवून एकाने केजरीवालांची मुलगी हर्षिता केजरीवाल हिला ३४ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिताने सोफा विकण्यासाठी OLXवर पोस्ट टाकली होती. एका भामट्याने ग्राहक असल्याचं भासवून फसवणूक केली. आरोपीनं विश्वास संपादित करण्यासाठी आधी सोफा विकत घ्यायचा असल्याचं दाखवलं. आरोपीनं सुरूवातीला हर्षिताच्या खात्यात काही पैसै पाठवले. त्यानंतर तिला एक क्युआर कोड स्कॅन करायला सांगितलं.

समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे हर्षिताने क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर तिच्या खात्यातून सुरूवातीला २० हजार रुपये काढले गेले. त्यानंतर दुसऱ्यांदा १४ हजार काढले गेले. हर्षिताच्या खात्यातून ३४ हजार रुपये काढले गेले. ऑनलाईन सोफा विकण्याच्या व्यवहारात एका भामट्याने खात्यातून पैसे लंपास केले.

या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. केजरीवाल यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत. मुलगी हर्षिता ही २०१४ मध्ये चर्चेत आली होती, जेव्हा तिने बारावीमध्ये ९६ टक्के गुण मिळवले होते. हर्षिता सध्या आयआयटी दिल्ली येथे रसायनशास्त्रातून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे.