काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक शनिवारी दिल्लीत पार पडली असून सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली आहे. या बैठकीत सोनिया गांधी यांनी काँग्रेसला मतदान करणाऱ्या १२. १३ कोटी मतदारांचे आभार मानले आहेत. तर राहुल गांधी यांनी पक्षाच्या खासदारांना संबोधित करताना इंच इंच लढवा, असे सांगितले. आपण सर्व जण संविधानाच्या रक्षणासाठी लढा देत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी शनिवारी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीत सोनिया गांधी यांनी उपस्थित खासदारांना मार्गदर्शन केले. सोनिया गांधी म्हणाल्या, काँग्रेसला मतदान करणाऱ्या १२. १३ कोटी मतदारांचे मी आभार मानते. या मतदारांनी काँग्रेसवर विश्वास दाखवला. सोनिया गांधी यांनी भाषणात राहुल गांधी यांचे देखील कौतुक केल्याचे काही वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी हे दूरदृष्टी असलेले नेते असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे समजते.

राहुल गांधी यांनी देखील खासदारांना मार्गदर्शन केले. प्रत्येक काँग्रेस खासदाराने एक गोष्ट लक्षात ठेवावी, की ते संविधानाच्या रक्षणासाठी लढा देत आहेत. जात, धर्म आणि वर्ण याचा विचार न करता ते प्रत्येक भारतीयासाठी लढा देत आहेत, असे त्यांनी खासदारांना सांगितले. काँग्रेसचे ५२ खासदारच भाजपाविरोधात इंच इंच लढवण्यासाठी पुरेसे आहेत, असा दावाही त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत काँग्रेस सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार, असे त्यांनी स्पष्ट केले.