दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या निषेधार्थ रा. स्व. संघाच्या मुख्यालयाबाहेर निदर्शने करणाऱ्या निदर्शकांना दिल्ली पोलीस मारहाण करीत असल्याची आणि महिला कार्यकर्त्यांच्या केसांना धरून त्यांना फरफटत नेण्यात येत असल्याची फीत प्रसारित झाल्याने दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका होत आहे.
शनिवारी घडलेल्या या प्रसंगाची फीत समाजमाध्यमांवरून प्रसारित होताच त्यावर टीका सुरू झाली आहे. या निदर्शनाचे वृत्तांकन करीत असताना मारहाण झाल्याचा आरोप दोन पत्रकारांनी केला.
निदर्शकांना निर्दयपणे मारहाण करण्यात आली, असा दावाही पत्रकारांनी केला आहे. आपल्या सहकारी निदर्शकाला मारहाण करण्यात आल्याचे कळताच दुसऱ्या महिला निदर्शकाने निदर्शने केली तेव्हा एक कॉन्स्टेबल तिचे केस धरून तिला खाली पाडत असल्याचे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे.
सदर फीत पाहिल्यानंतर पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांना या बाबत तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
केजरीवाल यांचा आरोप
दिल्ली पोलिसांचा वापर रा. स्व. संघ आणि भाजपचे खासगी लष्कर म्हणून करण्यात येत असून त्यांनी देशातील विद्यार्थ्यांविरुद्ध युद्ध पुकारले आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.