दिल्लीत गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात जवळपास ९०० करोना रुग्णांची नोंद झाल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच इतकी कमी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर दिल्लीत मृत्यूदरही नियंत्रणात आला आहे. त्यामुळे दिल्लीचं अनलॉकच्या दिशेने पाऊल पडत असल्याचं सकारात्मक चित्र आहे.

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये ‘ड्राइव्ह थ्रू व्हॅक्सिनेशन’चं उद्घाटन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते करण्यात आलं. तेव्हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही उपस्थित होते. दिल्लीत सध्या ३१ मे पर्यंत लॉकडाउन आहे. दिल्लीतील करोना स्थिती पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाचव्यांदा लॉकडाउनचा अवधी वाढवला होता. मेट्रोवरसेवाही या कालावधीत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

दिल्लीत रुग्णसंख्या कमी झाली असली तरी लसीकरण मोहिम मंदावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परदेशातून व्हॅक्सिन खरेदीची योजना आखली आहे. दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाने १० दशलक्ष डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढलं आहे. या टेंडरसाठी प्रस्ताव भरण्याची ७ जून ही शेवटची तारीख आहे.

“आयएमए’च्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा, बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना बरं केलंय”

देशातही दुसर्‍या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. सलग दुसर्‍या दिवशी देशात दोन लाखांहून कमी करोना रुग्ण आढळले. गेल्या २४ तासात एकूण १.७३ लाख नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या ४५ दिवसातील सर्वात कमी संख्या आहे. या कालावधीत ३६१७ लोकांनी करोनामुळे आपला जीवही गमावला आहे. डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या सलग १६ व्या दिवशी बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे. गेल्या एका दिवसातच २.४८ लाख रुग्ण बरे झाले आहेत. यासह, भारतात सध्या रिकवरी रेट ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि तो वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. भारतात सध्या करोनाची एकूण २२,२८,७२४ सक्रिय प्रकरणे आहेत.