करोनाचा कहर पुन्हा एकदा वाढू लागल्याने राज्यांनी कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. यासोबत पुन्हा एकदा मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान नियमांची काटेकोरपणे अमबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांना सर्वसामान्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये पोलिसांनी मास्कची विचारणा केली म्हणून दांपत्याने पोलिसांना भररस्त्यात शिवीगाळ केली. घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दांपत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

दिल्लीमध्ये ही घटना घडली आहे. वीकेण्ड कर्फ्यूचं उल्ंलंघन केल्याबद्दल तसंच करोना संबंधित नियमांचं पालन न केल्याने पोलिसांनी दांपत्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पंकज दत्ता आणि आभा यांची कार थांबवून पोलिसांनी त्यांना मास्क न घालण्यासंबंधी विचारणा केली. यानंतर दोघांनीही पोलिसांना शिवीगाळ करत असभ्य वर्तन केलं. पोलिसांनी दंड आकारलं असताना महिलेने पोलिसांचा उल्लेख भिकारी असा केल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे.

दिल्लीमधील दरियागंज भागात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. फक्त अत्यावश्यक सेवा आणि ई-पास असणाऱ्यांना बाहेर फिरण्याची परवानगी होती. रस्त्यावर दांपत्याकडून सुरु असलेल्या गोंधळामुळे वाहतूक कोंडी झाली होती. दांपत्याकडे ना कर्फ्यू पास होता ना मास्क होते. पोलिसांनी रोखल्यानंतर महिलेने कारमधूनच त्यांच्यावर आरडाओरड करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर आपण आपल्या पतीला किस करु असंही उलट उत्तर दिलं.

महिलेने पोलिसांसोबत असभ्य वर्तन करताना करोनासारखी कोणतीही गोष्ट नाही म्हणत विनाकारण लोकांना त्रास दिला जात असल्याचा आऱोप केला. हिंमत असेल तर दंड लावा असं आवाहनही त्यांनी दिलं. यानंतर अधिकाऱ्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याला बोलावून दांपत्याला नेलं. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. दांपत्याला पोलिसांनी अटक केली आहे.