लष्कर-ए-तोयबाला बॉम्ब तयार करून देणारा आणि २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याबरोबरच तब्बल ४० हल्ल्यांसाठी साह्य़ केल्याचा संशय असलेला ७४ वर्षीय संशयित अतिरेकी अब्दुल करीम टुंडा याच्यासह तीन आरोपींची दिल्ली उच्च न्यायालयाने शनिवारी पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. गुप्तचर यंत्रणांनी नेपाळ हद्दीत १६ ऑगस्ट २०१३ला शिताफीने अटक केलेल्या टुंडाच्या या सुटकेने केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांवर नामुष्की ओढवली आहे.

१९९७मध्ये भारतात घातपाती कारवाया घडविण्यासाठी पाकिस्तानी आणि बांगलादेशी अतिरेक्यांच्या घुसखोरीस सहाय्य केल्याचा टुंडा याच्यावर आरोप होता. इंटरपोलने त्याच्यावर रेडकॉर्नर नोटीसही बजावली होती. हा त्याच्याविरुद्ध नोंदलेला चौथा आणि अखेरचा गुन्हा होता. २६/११च्या मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानकडे २० अतिरेक्यांना ताब्यात देण्याची मागणी केली होती. त्यात टुंडाचेही नाव होते.

टुंडासोबत त्याचे सासरे महम्मद झकेरिया आणि त्याचे दोन निकटचे साथीदार अल्लाउद्दिन आणि बशिरूद्दिन यांचीही सुटका झाली आहे. देशाविरुद्ध युद्ध पुकारणे यापासून अनेक गंभीर गुन्हे दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने त्यांच्याविरुद्ध नोंदविले होते. मात्र एकाही गुन्ह्य़ातील या चौघांच्या सहभागाचा एकही पुरावा दिल्ली पोलिसांना देता आला नाही.