भाजप नेते नितीन गडकरी यांची बदनामी केल्याविरोधात दहा हजार रुपयांचा जातमुचलका भरण्यास नकार दिल्याने आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ६ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे केजरीवालांच्या तिहार मुक्कामात वाढ झाली आहे.
केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी
नितीन गडकरी यांनी केजरीवालांविरोधात खोटे आरोपकरून बदनामी केल्याचा खटला दाखल केला होता. या खटल्यात केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन देताना न्यायालयाने १० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका भरण्यास सांगितले होते. मात्र, ही रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे केजरीवाल यांना न्यायालयाने तातडीने २३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत केजरीवाल यांनी पुन्हा एकदा जातमुचलका भरण्यास नकार दिला. त्यामुळे  दिल्लीतील पतियाळा दंडाधिकारी न्यायालयाने  ६ जूनपर्यंत केजरीवालांच्या कोठडीत वाढ केली आहे. 
केजरीवालप्रकरणी आप उच्च न्यायालयात जाणार?
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून तिहार कारागृहाबाहेर आपचे कार्यकर्ते निदर्शेने करत आहेत. तसेच पतियाळा शहर दंडाधिकाऱ्यांचा निर्णय अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गेल्यास त्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागू असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत जामिनासाठी बद्धपत्र (बाँड) व जातमुचलक्याची रक्कम भरणार नाही, असेही पक्षाने स्पष्ट केले आहे