आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना २४ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केजरीवाल आणि त्यांचे सहकारी न्यायालयात हजर न राहिल्यास अन्य मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशारा दिल्लीतील न्यायालयाने दिला आहे.
केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांचा पुत्र अमित सिब्बल यांनी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा बदनामीचा खटला दाखल केला असून त्या प्रकरणी केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना २४ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केजरीवाल, मनीष सिसोदिया, प्रशांत भूषण आणि शाजिया इल्मी यांचे वकील राहुल मेहरा न्यायालयात हजर होते. या खटल्याच्या सुनावणीच्या दिवशी सदर चौघे न्यायालयात हजर राहतील, याची काळजी घ्यावी, असे महानगर दंडाधिकारी सुनीलकुमार शर्मा यांनी मेहरा यांना सांगितले.