दिल्ली सरकारने दिवाळीत फटाक्यांवर बंदीचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. करोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा आणि रुग्णालयांमध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला. याआधी राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि हरियाणा या राज्यांनीही फटाक्यांवर बंदी घातली आहे.

सध्या सुरु असलेला सणांचा हंगाम आणि प्रदूषण यामुळे दिल्लीतील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि दंडाधिकाऱ्यासोबत करोना आढावा बैठकीनंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसत आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत दिवसाला सहा हजाराहून जास्त रुगांची नोंद झाली.

अरविद केजरीवाल यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि दंडाधिकाऱ्यासोबत करोनास्थितीचा आढावा घेतला. सणांचा काळ आणि प्रदूषण यामुळे करोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे फटाक्यांवर बंदी तसंच वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमधील सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि आयसीयू बेडही वाढवले जाणार आहेत”.

याआधी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना दिवाळीत फटाके फोडू नका असं आवाहन केलं होतं.