दिल्लीमध्ये करोनामुळे अक्षरशः हाहाकार उडाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली असून, करोनाच्या चौथ्या लाटेनं दिल्लीतील आरोग्य व्यवस्था कोलमडायला लागली आहे. त्यामुळे केजरीवाल सरकार करोना नियमांच्याबाबतीत आक्रमक झाले आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना करोना निगेटिव्ह रिपोर्ट बंधनककारक केलेले असताना चार विमान कंपन्यांनी यात हलगर्जीपणा केला. त्यामुळे दिल्ली सरकारने चारही विमान कंपन्यांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये करोनाची दुसरी लाट आल्यानंतर दिल्ली सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना करोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे केलं आहे. त्याशिवाय दिल्लीत प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. असं असताना चार विमान कंपन्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांचे करोना निगेटिव्ह रिपोर्टच तपासले नसल्याचं समोर आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर केजरीवाल सरकारने इंडिगो, विस्तारा, स्पाईस जेट आणि एअर एशिया या चार विमान कंपन्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत तक्रार दाखल केली आहे. या कंपन्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीत चौथ्या करोना लाटेचा उद्रेक झाल्यानंतर १० एप्रिल रोजी दिल्ली सरकारने नवीन निर्बंध जाही केले होते. यात महाराष्ट्रातून दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांना करोना निगेटिव्ह चाचणी बंधनकारक केलेली आहे. निगेटिव्ह रिपोर्ट नसणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाइन सक्तीचे करण्यात आलेले आहे. हे निर्बंध ३० एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत. करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असताना चार विमान कंपन्यांनी महाराष्ट्रातून दिल्ली जाणाऱ्या प्रवाशांचे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्रच तपासले नसल्याचं समोर आलं.