दिल्लीच्या साराई रोहिल्ला भागात शनिवारी रात्री एक विचित्र अपघात घडला. यामध्ये तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवरुन खाली पडलेला माणूस चमत्कारिकरित्या बचावला तर त्याचवेळी हातगाडीवर झोपलेला माणूस दुर्देवी ठरला. साराई रोहिल्ला भागात राहणारे मदन लाल (६०) रात्री आपल्या हातगाडीवर झोपले होते. त्याचवेळी शेजारच्या इमारतीत रहाणाऱ्या रविंद्र यांचा तोल गेला व ते गच्चीवरुन खाली पडले. रविंद्र यांच्या सुदैवाने ते मदन लाल यांच्या अंगावर जाऊन कोसळले. त्यामुळे त्यांचे प्राण बचावले. पण रविंद्र यांच्या वजनाने ६० वर्षीय मदन लाल यांचा मृत्यू झाला.

रविंद्र यांना किरकोळ फ्रॅक्चर झाले असून त्यांच्या डोळयाकडच्या बाजूला थोडा मार लागला आहे. शनिवारी रात्री मी गच्चीच्या टोकावर बसून मोबाइलवर बोलत होतो. त्यावेळी अचानक माझा तोल गेला व मी खाली पडलो असे रविंद्र यांनी पोलिसांना सांगितले. रविंद्र यांचे वजन ९० किलो आहे. इतक्या उंचावरुन झालेल्या जोरदार आघातामुळे मदन लाल यांच्या बरगडया मोडल्या होत्या. अन्य अवयवानांही मार लागला होता असे त्यांच्या शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.

ही घटना घडण्याच्या काही वेळ आधी मदन लाल त्यांच्या नातीसोबत ललिता कॉलनी येथे खेळण्यासाठी गेले होते. नीताला झोप आल्यामुळे ते तिला घरी घेऊन आले. रात्री १०.३०च्या सुमारास ते झोपण्यासाठी बाहेर आले. रविंद्र मदन लाल यांच्या अंगावर कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. सुरुवातीला इमारतीचा एखादा भाग कोसळला असे शेजाऱ्यांना वाटले. स्थानिकांनी जेव्हा दोघांना जखमी अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर मदनलाल यांना मृत घोषित केले.