दिल्ली बलात्कार-खून प्रकरण

नवी दिल्ली : गुन्ह्य़ाच्यावेळी अल्पवयीन असल्याचा दावा नाकारण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालास आव्हान देणारी दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवनकुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.

देशाचे लक्ष लागलेल्या या खटल्यातील चार आरोपींना १ फेब्रुवारीला सकाळी  ६ वाजता फाशी देण्याचा आदेश दिल्ली न्यायालयाने आधीच जारी केला आहे. पवनचे वकील ए. पी. सिंह यांनी सांगितले की, पवनच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यानुसार गुन्ह्य़ाच्यावेळी तो अल्पवयीन होता. परंतु कनिष्ठ न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने त्याची कोणतीच कागदपत्रे पाहिली नाहीत.

सरकारी वकील तुषार मेहता दिल्ली पोलिसांची बाजू मांडताना म्हणाले, ‘पवन याचा गुन्ह्य़ावेळी अल्पवयीन असल्याचा दावा प्रत्येक टप्प्यावर विचारात घेण्यात आला होता. अशा प्रकारे हा दावा वारंवार उपस्थित करू देणे म्हणजे न्यायाची थट्टा आहे. गुन्ह्य़ावेळी आरोपीचे वय १९ होते. त्याचा शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्मप्रमाणपत्र न्यायालयातील प्रत्येक टप्प्यात विचारात घेतले गेले आहे.’

दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही. पवनकुमार गुप्ता याची गुन्ह्य़ावेळी अल्पवयीन असल्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयाने योग्य कारणास्तव फेटाळली होती, असे मत न्या. आर. बानुमती, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. एस बोपण्णा यांनी व्यक्त केले.  १ फेब्रुवारीची  फाशी लांबणीवर टाकण्याची मागणीही त्याने केली होती.