सर्वोच्च न्यायालयाच्या तत्कालिन न्यायाधीशांनी लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप करणाऱया महिला वकिलाने लवकरात लवकर दिल्ली पोलिसांकडे आपला जबाब नोंदवावा त्यामुळे पुढे रितसर चौकशीला सुरुवात करता यईल असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार संबंधित महिला वकिलाला ई-मेलही पाठविण्यात आला आहे.
दिल्ली पोलीस संचालक एसबीएस त्यागी म्हणाले, “आम्ही संबंधित महिला वकिलाला लवकरात लवकर याप्रकरणाची संपूर्ण माहिती देण्यासाठी सांगितले आहे. महिलेच्या जबाबशिवाय आम्हाला पुढील चौकशी करता येणार नाही. त्याचप्रमाणे ज्या संकेतस्थळावर त्या महिलेने आपले मत मांडले होते त्या संकेतस्थळाशी संपर्क साधून महिलेचा दूरध्वनी क्रमांक मागितला आहे. जेणे करून आम्हाला संपर्क साधता येईल.”  
सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर संबंधित महिलेने आपल्यावरील प्रसंगाबाबत ११ नोव्हेंबर रोजी माहिती दिली होती. मात्र, आता ती काढून टाकण्यात आली आहे. लिगली इंडिया या संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोलकात्यातील कायदेविषयक शिक्षण देणाऱया एका नामांकित संस्थेतून संबंधित महिलेने शिक्षण घेतले आहे. तिने फेसबुक खात्यावर स्वतःवरील लैंगिक छळवणुकीबद्दल माहिती दिली होती. एकूण तीन वेळा तिची लैंगिक छळवणूक करण्यात आली, असे तिने लिहिले होते.