छोटा शकीलच्या शूटरला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने गँगस्टर छोटा शकीलचा शूटर जुनैद चौधरीला गुरूवारी रात्री अटक केली होती. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. जगप्रसिद्ध लेखक तारेक फतेह यांच्या हत्येचा कट जुनैदने रचला होता. अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे उप आयुक्त प्रमोदसिंग कुशवाहा यांनी दिली आहे. जुनैदला याआधीही गेल्यावर्षी ३ जूनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. जुनैद इंटरनेट आणि चॅटच्या माध्यमातून छोटा शकीलच्या संपर्कात होता असेही पोलिसांनी सांगितले आहे. त्याला गुरूवारी रात्री दिल्लीतल्या गगन सिनेमागृहाजवळून अटक करण्यात आली.

छोटा राजनच्या हत्येचा कटही याआधी जुनैदने रचला होता. यासाठी जुनैद हा रॉबिनसन, युनुस आणि मनिष या सुपारी किलर्सच्या संपर्कात होता. जुनैदच्या मोबाईलमधून पोलिसांना छोटा राजन आणि त्याच्या संवादाचे रेकॉर्डिंगही मिळाले आहे. आता तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत तारेक फतेह यांच्या हत्येचा कट का रचला होता? तो त्यांची हत्या कशी करणार होता यासंदर्भात जुनैदची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे.