दिल्लीतील दंगलीचा संसदेच्या आवारात विरोधकांकडून निषेध

नवी दिल्ली : दिल्ली दंगलीच्या मुद्दय़ावर तृणमूलच्या खासदारांनी संसदेच्या आवारात सोमवारी डोळ्याला काळी पट्टी आणि तोंडावर बोट ठेवून केंद्र सरकारचा निषेध केला. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची ही कृती म्हणजे गांधीजींच्या तीन माकडांचे अनुकरण होते.

तृणमूलच्या सदस्यांनी राज्यसभेतही याच पद्धतीने निषेध केला. राज्यसभेत तृणमूलचे खासदार डोळ्याला काळी पट्टी बांधून आपल्या जागेवर उभे राहिले. त्यावर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. तुम्हाला सभागृहात अशा पद्धीने निदर्शने करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे नायडू म्हणाले. त्यानंतर काँग्रेस आणि आपच्या सदस्यांनी दिल्ली दंगलीवर चर्चा करण्याची मागणी केली. हे सदस्य आक्रमक होत मोकळ्या जागेत येत असल्याचे पाहताच नायडू यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी दोनपर्यंत तहकूब केले.

निदर्शनांच्या वेगळ्या चुली!

संसदेच्या आवारात काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी स्वतंत्रपणे निदर्शने केली. काँग्रेसचे राहुल गांधी, शशी थरूर, अधीर रंजन चौधरी आदी खासदारांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. आपचे चार खासदार संजय सिंह, भगवंत मान आदींनी ‘भाजप मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात निदर्शने आणि घोषणाबाजी केली असली तरी त्यासाठी ते एकत्र आल्याचे दिसले नाही!

दुपारी दोन वाजता राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस, आप, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, डाव्या पक्षांच्या सदस्यांनी नारेबाजी सुरू केली. या गदारोळातच उपसभापती हरिवंश यांनी केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या विधेयकावर चर्चेला परवानगी दिली. मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी चच्रेसाठी विधेयक पटलावर मांडले. भाजपच्या वतीने सत्यनारायण यांनी भाषण सुरू केले  पण, गोंधळात त्यांचे म्हणणे समजत नव्हते. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

केंद्र सरकार निष्क्रिय : आझाद

सकाळच्या सत्रात नायडू यांनी दिल्ली दंगलीवर चर्चा करण्यासाठी दिवस-वेळ निश्चित करण्याची सूचना केली मात्र, विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद तसेच अन्य विरोधी सदस्यांनी तात्काळ चर्चा करण्याची मागणी केली. केंद्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे दिल्लीत तीन दिवस दंगल होत राहिली. दंगल आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले नाहीत, असा आरोप आझाद यांनी केला. त्यावर, सभागृहाचे नेते थावरचंद गेहलोत यांनी आझाद यांचा आरोप खोडून काढत, केंद्र सरकारने दंगल आटोक्यात आणलेली असून आता दिल्लीत शांतता असल्याचे सांगितले.