फाइव्ह स्टार हॉटेलच्या वॉशरुममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. दिल्ली येथील मयुर विहार भागात ही घटना घडली आहे. हॉटेल हॉलिडे इन असे या हॉटेलचे नाव आहे. गुरुवारी रात्री उशिरा या हॉटेलच्या स्वच्छतागृहात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ही महिला कोण आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही मात्र ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत या हॉटेलमध्ये राहात होती अशी माहिती समोर आली आहे.

स्वच्छतेसाठी हॉटेल कर्मचाऱ्यांकडून जे राऊंड होतात त्या दरम्यान रुम नंबर ११३७ च्या वॉशरुममध्ये महिलेचा मृतदेह शुद्ध हरपलेल्या अवस्थेत आढळला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी या महिलेला तातडीने रुग्णालयात हलवले मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

वैद्यकीय अहवालानुसार या महिलेच्या मृतदेहावर कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. तसेच काहीही संशयास्पदही आढळले नाही. फॉरेन्सिंग टीमपुढे या मृत्यूचे गूढ उकलण्याचे आव्हान आहे. फॉरेन्सिक विभागाची टीम शुक्रवारी या हॉटेलमधील रुमला भेट देणार आहे अशीही माहिती समोर आली आहे. ही महिला आणि तिचा बॉयफ्रेंड दोघेही दिल्ली येथील शारदा भागात राहात होते मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी वास्तव्यास होते अशी माहिती समोर आली आहे. इंडिया.कॉमने या संदर्भातले वृत्त दिले आहे.