कुख्यात डॉन अबू सालेमविरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने प्रॉडक्शन वॉरंट जारी केला आहे. २००२ मध्ये अबू सालेमने दिल्लीतील एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावले होते. त्याच प्रकरणात हे वॉरंट नव्याने जारी करण्यात आले आहे. हे प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी १६ फेब्रुवारीला होणार आहे.

दिल्लीतील व्यापारी अशोक गुप्ता यांच्याकडे अबू सालेमने फोनवरून पाच कोटी रूपयांची खंडणी मागितली होती. तसेच ही खंडणी न दिल्यास तुझ्या कुटुंबाला संपवून टाकेन अशी धमकीही दिली होती. त्यानंतर ५ एप्रिल २००४ ला पुन्हा एकदा गँगस्टर अबू सालेमने या व्यापाऱ्याला फोन केला आणि खंडणीची रक्कम दिली नाही तर कुटुंबाला ठार करण्याची धमकी दिली. अबू सालेमसोबतच इतर पाच आरोपींविरोधात अशोक गुप्ता यांच्याकडून खंडणीचे पाच कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप आहे. आरोपी सज्जनकुमार सोनी हा या पाचजणांमधलाच एक आरोपी असून त्याचा मृत्यू झाला आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

अबू सालेम हा मुंबईत झालेल्या १९९३ च्या स्फोटांप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगतो आहे. खंडणी मागण्यासाठी तो कुप्रसिद्ध होता. बॉलिवूडमध्ये त्याच्या नावाची दहशत होती. त्याचा जन्म १९६० च्या दशकात झाला. त्याला अकील अहमद, कॅप्टन, अबू समान या नावाने ओळखले जाते. त्याचे वडील वकिली करायचे. मात्र एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अबू सालेम गुन्हेगारी जगताकडे वळला. गुन्हेगारी जगतात आल्यानंतर काही दिवसातच अबू सालेम आणि दाऊद इब्राहिम यांची भेट झाली. त्यानंतर अबू सालेम डी कंपनीसाठी काम करु लागला.

अबू सालेमचा चुलत भाऊ अख्तरही त्याच्यासोबत काम करु लागला. अत्यंत अल्पकाळात अबू सालेमने त्याच्या अक्कल हुशारीने डी कंपनीत स्वतःचे स्थान तयार केले. १९९१ ला अबू सालेमला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप त्यावेळी अबू सालेमवर होता. मुंबई पोलिसांकडे अबू सालेमचे फोटो आणि हाताचे ठसे येण्याची ती पहिली वेळ होती. त्यानंतर १९९३ च्या स्फोटानंतर अबू सालेम दुबईत पळाला. दुबईत त्याने दाऊदचा भाऊ अनिससोबत काम केले. आता २००२ च्या खंडणी प्रकरणात त्याच्या विरोधात पुन्हा एकदा प्रॉडक्शन वॉरंट जारी करण्यात आला आहे.