नव्या नोटांच्या अभावी आर्थिक व्यवहार अशक्य; देशात अनागोंदी

भारतापाठोपाठ निश्चलनीकरणाचा निर्णय घेतलेल्या दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्येही नव्या पर्यायी चलनाच्या अभावी आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून त्यामुळे आधीच गोंधळाची स्थिती असलेल्या या देशात दंगलसदृश वातावरण आहे.

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी ११ डिसेंबर रोजी अचानक देशातील सर्वाधिक मूल्याच्या, म्हणजे १०० बोलिव्हरच्या, नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. देशात चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी ७७ टक्के नोटा १००  बोलिव्हरच्या होत्या. त्यांच्या ऐवजी ५०० आणि अधिक मूल्याच्या चलनी नोटा लवकरच जारी करण्याचे मादुरो यांनी जाहीर केले. गुरुवारी टेलिव्हिजनवरून दिलेल्या संदेशात त्यांनी ५०० बोलिव्हरची नवी नोट दाखवलीही. पण शुक्रवारी त्या नव्या नोटा बँकांमध्ये दाखल झाल्या नव्हत्या. बँकांमध्ये रद्द झालेल्या जुन्या १०० बोलिव्हरच्याच नोटा होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी बँकांसमोर रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांचा संयम सुटला आणि संघर्ष उसळला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली.

नोटाबंदीचे कारण..

व्हेनेझुएलाच्या बोलिव्हर या चलनाची किंमत खूप घसरली आहे. १०० बोलिव्हरची किंमत दोन अमेरिकी सेंट्स इतकी कमी आहे. त्यात एक चॉकलेटसुद्धा मिळत नाही. देशात महागाईचा दर जगातील सर्वाधिक म्हणजे ४०० टक्क्य़ांहून अधिक आहे. त्यातच भ्रष्टाचार बोकाळला आहे. माफियांनी मोठय़ा प्रमाणात काळा पैसा शेजारील कोलंबिया आणि ब्राझिलमध्ये साठवून ठेवला आहे. चलन रद्द केल्यास माफियांचा काळा पैसा मातीमोल ठरून भ्रष्टाचारावर नियंत्रण येईल, असा मादुरो यांचा कयास आहे.

अर्थव्यवस्थेची दुरवस्था..

व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने खनिज तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमती घसरल्याने देशाचे उत्पन्न अचानक मोठय़ा प्रमाणात घटले. देशात अन्य उद्योगधंदे अभावानेच आहेत. यापूर्वीचे अध्यक्ष ह्य़ुगो चॅवेझ आणि सध्याचे अध्यक्ष मादुरो यांच्या राजवटीत उद्योगांच्या विकासाला पोषक धोरण राबविले गेले नाही. त्यामुळे अगदी जीवनावश्यक वस्तूंचा आणि अन्नधान्याचाही तुटवडा आहे.

कायदा सुव्यवस्था स्थिती गंभीर..

अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा असल्याने त्यांची वाहतूक पोलीस व लष्कराच्या सुरक्षेत करावी लागत आहे. एखाद्या दुकानात काही जिन्नस दाखल झाल्याचे कळताच नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी तेथे जमा होऊन दंगल उसळते. त्यातच आता चलनतुटवडय़ाची भर पडली आहे. हाती पैसा नाही, बाजारात वस्तू नाहीत अशी नागरिकांची अवस्था आहे. माफियांना शेजारच्या कोलंबिया आणि ब्राझिलमध्ये साठवलेला काळा पैसा देशात आणता येऊ नये म्हणून देशाच्या सर्व सीमा बंद केल्या असून सेनादलांचा कडक पहारा ठेवला आहे. त्याने सुरक्षाविषयक परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.