25 September 2020

News Flash

दिल्लीत राजपथावर सातस्तरीय सुरक्षा

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथमच अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा हे भारतात आल्याने दिल्लीभोवती सुरक्षेची अभेद्य तटबंदी उभी करण्यात आली आहे.

| January 26, 2015 01:03 am

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथमच अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा हे भारतात आल्याने दिल्लीभोवती सुरक्षेची अभेद्य तटबंदी उभी करण्यात आली आहे. ओबामा यांच्या भारतभेटीला रविवारी सुरुवात झाली. ओबामा यांचे भव्य स्वागत झाल्यानंतर दोन्ही नेते व उभय देशांच्या शिष्टमंडळात चर्चा झाली.
ओबामा यांच्या आगमनामुळे मध्य दिल्लीत सुरक्षेची बहुस्तरीय तटबंदी उभी करण्यात आली असून त्यात दिल्ली पोलिसांच्या ४० हजार जवानांचा समावेश आहे. निमलष्करी दलाचे जवान कानाकोपऱ्यात सुसज्ज आहेत. किमान १५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात आले आहेत, त्यामुळे केंद्रीय नियंत्रण कक्षात सर्व हालचाली टिपल्या जात आहेत. दिल्ली पोलीस अमेरिकी गुप्तचर सेवा व केंद्रीय सुरक्षा दले अशी सुरक्षेची रचना आहे.
राजपथाजवळ तटबंदी
राजपथपासून तीन कि.मी.च्या पट्टय़ात संचलनामुळे सातस्तरीय सुरक्षा आहे तेथे १६० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. दर १८ मीटरवर एक कॅमेरा आहे. स्नायपर्स व स्पॉटर्स हे इमारतींवर  प्रजासत्ताक दिन संचलनाच्या दिवशी पहारा देतील. आकाशात संशयास्पद हालचाली दिसल्यास त्या टिपण्यासाठी रडार लावण्यात आले आहे व एखादे विमान बंदी क्षेत्रात आल्यास ते पाडण्यासाठी विमानभेदी बंदुका आपले काम करतील. दिल्लीवरून जाणारी सर्व विमाने वळवण्यात येत आहेत. आता उड्डाणबंदीची मर्यादा ३५ हजार फूट करण्यात आली आहे. राजपथपासून ४०० किमी त्रिज्येत एकही विमान उडणार नाही.

बराक ओबामा यांनी महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन राजघाटावर पुष्पांजली वाहिली. गांधीजींची अिहसेची व शांततेची विचारसरणी म्हणजे जगाला मोठी देणगी आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांना या वेळी चरख्याची प्रतिकृती भेट देण्यात आली.मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर जे म्हणाले होते ते आजही सत्य आहे. गांधीजींची शिकवण आजही भारतात कायम आहे, जगाला ती मोठी देणगी आहे. जगातील सर्व लोक व देशांना प्रेम व शांततेच्या वातावरणात राहण्याची संधी मिळावी अशीच अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.राष्ट्रपती भवनावरील स्वागतानंतर ओबामा थेट राजघाटावर गेले.

ओबामांचे राष्ट्रपती भवनात स्वागत
ओबामा यांचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात स्वागत केले. तेथे त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली.हा आपल्यासाठी मोठा सन्मान असून या आदरातिथ्याबद्दल आपण आभारी आहोत, असे ओबामा यांनी सांगितले.
ओबामा यांना विंग कमांडर पूजा ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने मानवंदना दिली. मुखर्जी यांनी ओबामांची ओळख मंत्री व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी करून दिली.

एक नूर आदमी दस नूर कपडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोशाखाच्या शैलीची नेहमी प्रशंसा केली जाते. आजही अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या विमानतळावरील स्वागतप्रसंगी त्यांनी पारंपरिक कुर्ता पायजमा परिधान केला होता. तसेच सोनेरी व लाल रंगाचे उपरणे गळ्याभोवती दिसत होते. ओबामा यांनी उद्योगपती परिधान करतात तसा काळ्या रंगाचा सूट घातला होता. त्यांची पत्नी मिशेल यांनी निळा व काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. मोदी यांनी नंतर राष्ट्रपती भवनात बंद गळा सूट परिधान केला होता. त्यांच्या पोशाखाची अमेरिकेतील वृत्तपत्रांतही त्या वेळी खूप चर्चा झाली .

‘स्मार्ट सिटी’साठी मदत
अमेरिका भारतात तीन शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यास मदत करणार आहे. त्यापैकी विशाखापट्टणम शहरासाठी आंध्र सरकार व अमेरिकेतील कंपनीने परस्पर सामंजस्य करारावर रविवारी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार निधी, प्रशिक्षण अशा बाबींमध्ये अमेरिकन संस्था मदत करणार आहे.

पूजा ठाकूर यांना बहुमान
मी प्रथम अधिकारी आहे व नंतर महिला आहे, हे उद्गार आहेत विंग कमांडर पूजा ठाकूर यांचे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे राष्ट्रपती भवन येथे स्वागत करताना त्यांना इंटर सव्‍‌र्हिसेस गार्डच्या दलाने सलामी दिली, त्यात पूजा ठाकूर यांनी नेतृत्व केले. ठाकूर या इ.स. २००० मध्ये भारतीय हवाई दलात सामील झाल्या. त्या प्रशासकीय शाखेत काम करीत होत्या. नंतर त्यांची नियुक्ती ‘दिशा’ या प्रशासन सेवेत झाली. आपण नोकरी म्हणून हवाई दलात आलो असे नाही, तर जे आयुष्य आपल्याला हवे होते ते घडवण्यासाठी आलो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2015 1:03 am

Web Title: deven fold security no fly zone at rajpath delhi as obama arrives in india
Next Stories
1 तोफांच्या सलामीने ओबामांचे राष्ट्रपती भवनात स्वागत
2 पोलीस दलातील ६८ जणांना राष्ट्रपतींचे पुरस्कार
3 दिल्लीत ‘सेल्फी विथ मोदी’; भाजपचे नवे प्रचारतंत्र
Just Now!
X