करोनाऐवजी केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आणल्याची टीका करणाऱ्या उद्योगपती आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्या वक्तव्यावर  विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. राजीव बजाज हे कोविडचे तज्ज्ञ नसून त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलं.

“बजाज कुटुंब मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये उद्योग क्षेत्रातील मोठं नाव आहे. राजीव बजाज यांनी नुकतेच लॉकडाउनसंदर्भात मत व्यक्त करताना केंद्र सरकारने चुकीचा आलेख खाली आणला अशी टीका केली आहे यासंदर्भात तुमचे काय मत आहे?,” असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी राजीव बजाज यांचे मत अंतीम सत्य असू शकत नाही असं म्हटलं. “बजाज कुटुंब हे वाहन निर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ते आरोग्य क्षेत्रातील किंवा कोविडचे तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे कोविडसंदर्भात काय केलं पाहिजे हे त्यांचं मत अंतिम सत्य असू शकत नाही. ते स्कूटर कशी बनवायला हवी होती, रिक्षा कशी बनवायला हवी होती किंवा कार कशी बनवायची यासंदर्भात बोलले असते तर ते अंतिम सत्य असू शकतं. मात्र कोविडदरम्यान काय केलं पाहिजे याबद्दल तुमचं किंवा माझं मत असू शकतं तसच राजीव बजाज यांचे एक मत असू शकते,” असं उत्तर फडणवीस यांनी दिली.

नक्की वाचा >> “तुम्ही करोनाऐवजी अर्थव्यवस्थेचा आलेखच खाली आणला”; राजीव बजाज यांचा केंद्र सरकारवर निशाणा

राजीव बजाज यांनी दिलेल्या स्पेनच्या उदाहऱणावरुन फडणवीस यांनी स्पेनमधील मृत्यूदराचा दाखला दिला. “त्यांनी जे स्पेनचे उदाहरण दिलं तिथे लॉकडाउन करण्यात आलं नाही. तिकडचे व्हिडिओ समोर येत आहेत ते बघा. त्यावर तज्ज्ञांची मतं समोर आली आहेत. तेथील मृत्यूदर कमी करता आला असता मात्र तो थांबवण्यात आला नाही. लॉकडाउन न केल्याने झालेल्या या गोष्टींचीही तिकडे चर्चा आहे. मला वाटतं एखाद्या गोष्टीबद्दल प्रत्येक व्यक्तीला मत मांडण्याचा अधिकार आहे तसं मत त्यांनी मांडलं आहे. हे काही तज्ज्ञांचं मत नाही असं मला वाटतं,” असं फडणवीस म्हणाले. मात्र बजाज यांनी भारतामध्ये अगदी कठोर लॉकडाउन लागू करण्यात आला असं मत मांडलं यावर काय सांगाल असं विचारण्यात आलं असता फडणवीस यांनी, “त्यांना वाटतं हा कठोर लॉकडाउन होता मला नाही वाटत हा कठोर होता. एखादा तज्ज्ञ हे बोलला असता तर वेगळी गोष्ट आहे. ते (राजीव बजाज) तज्ज्ञ नाहीत,” असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> “उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत असतील तर…”; फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

काय म्हणाले होते बजाज?

“भारतानं शेजाऱ्यांकडून शिकण्याऐवजी पाश्चिमात्यांच अनुकरण केलं. त्यांची भौगोलिक स्थिती, अन्य परिस्थिती आणि तापमान यांसारख्या गोष्टी निराळ्या आहे. आपण कठोर लॉकडाउन लागू करण्याचा प्रयत्न केला. परंतु तसं करता आलं नाही. यामुळे मात्र अर्थव्यवस्थेवर मात्र मोठा परिणाम झाला. करोनाच्या आलेखाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आला. भारताला जपान किंवा स्वीडनप्रमाणे पाऊल उचलणं अपेक्षित होतं. ते हर्ड इम्युनिटीच्या मार्गावर पुढे गेले. याचा अर्थ असा नाही की त्यांनी ज्या लोकांना करोनाचा धोका अधिक होता त्यांना मरण्यासाठी सोडून दिलं. याचा अर्थ असा आहे की सॅनिटायझेशन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं असा होता. आपल्याकडे दुर्देवानं पूर्ण लॉकडाउन राबवलाच गेला नाही. केंद्राने करोनाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आणला,” असं म्हणत बजाज यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत साधलेल्या वेबसंवादादरम्यान बजाज यांनी हे मत व्यक्त केलं होतं..