अमेरिकेत व्हिसा अर्जात दिलेल्या माहितीनुसार मोलकरणीस वेतन न दिल्याने अटकेची कारवाई झालेल्या न्यूयॉर्कमधील उपमहावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांची भारतीय दूतावासात वरिष्ठ राजनैतिक अधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून त्यांना विशेषाधिकार देऊन अगोदरच्या प्रकरणात संरक्षण मिळावे, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
हे पत्र भारताचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत अशोक मुखर्जी यांनी बान की मून यांना १८-१९ डिसेंबर दरम्यान दिले असून त्यात इतर कागदपत्रे, तसेच देवयानीच्या पासपोर्टचा तपशील दिला आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी सांगितले की, भारत-अमेरिका हे महत्त्वाचे भागीदार आहेत या आपल्या विधानाचे स्वागत अमेरिकेने केले असले तरी त्यांनी खोब्रागडे प्रकरणी योग्य ती कृती करावी अशी आमची अपेक्षा
आहे.
मुखर्जी यांनी पीटीआयला सांगितले की, बान यांना दिलेल्या पत्रात देवयानी खोब्रागडे यांना विशेषाधिकार व कारवाईपासून संरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली असून त्यांचे नाव प्रतिनिधी मंडळाच्या यादीत जिथेजिथे छापले आहे ते निदर्शनास आणले आहे.
संयुक्त राष्ट्रांनीही असे पत्र शुक्रवारी मिळाले असल्याचे स्पष्ट केले असून त्या पत्रातील विनंतीवर विचार सुरू आहे.