केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर आपण बसल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी अमित शाह यांच्यावर हा आरोप केला होता. गेल्या महिन्यात २० जानेवारीला पश्चिम बंगाल दौऱ्यावेळी अमित शाह यांनी विश्वभारती विद्यापीठाला भेट दिली तेव्हा रवींद्रनाथ टागोर यांच्या जागी बसून अनादर केला होता असा आरोप अधीर रंजन चौधरी यांच्याकडून करण्यात आला होता. या आरोपांवर अमित शाह यांनी लोकसभेत स्पष्टीकरण दिलं आहे.

अमित शाह यांनी आरोप फेटाळून लावताना रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंनीदेखील याची पुष्टी केली असल्याची माहिती दिली. “अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी बोलताना मी शांतीनिकेतन दौऱ्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर बसल्याचं सांगितलं. माझ्याकडे विश्वभारतीच्या कुलगुरूंचं पत्र आहे ज्यामध्ये त्यांनी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी खिडकीजवळ बसलो होतो जिथे कोणीही बसू शकतं,” असं अमित शाह यांनी लोकसभेत सांगितलं.

यावेळी अमित शाह यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र असं केलं होतं असा आरोप केला. “माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी तसंच दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी त्या ठिकाणी बसले होते. मी रवींद्रनाथ टागोरांच्या जागी बसलो नव्हतो पण माझ्याकडे दोन फोटो आहेत ज्यामध्ये पंडित नेहरु आणि राजीव गांधी त्या जागी बसलेले दिसत आहेत,” असं त्यांनी सांगितलं. राजीव गांधी सोबत चहा घेऊन बसले होते सांगताना अमित शाह यांनी फोटेदेखील सादर केले.