वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या अनेक बैठकांनंतर निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी घेतील. दरम्यान, पक्षातील अनेक जणांचा याला विरोध असल्याचं वृत्त समोर येत आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. नितीशकुमारांच्या जनता दल युनायटेड सोबत काम करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी जुलै महिन्यामध्ये तिन्ही गांधींशी अनेक बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये त्यांच्या पक्षातील भूमिकेबद्दल तपशीलवार चर्चा झाल्याची माहिती मिळते. दरम्यान, याबाबत आता सोनिया गांधीचा अंतिम निर्णय काय असणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे.

गेल्या उत्तर प्रदेश निवडणुकांच्या काळात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत काम केलं आहे. सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, या दोन्ही नेत्यांनी आणि त्यांना काँग्रेस पक्षात येण्यास कोणतीही हरकत नसल्याचं म्हटलं आहे. सोनिया गांधींनी प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्यासाठी अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत केलेल्या बैठकीत, काही नेत्यांनी त्यांना पक्षात घेण्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. तर काहींनी ते पक्षासाठी फायदेशीर ठरतील असं म्हणत त्यांच्या पक्षप्रवेशाला समर्थन दिलं आहे. दरम्यान, आता याबाबतचा अंतिम निर्णय हा सोनिया गांधी घेणार आहेत.

प्रशांत किशोरांकडे जादूची कांडी नाही!

सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत एका काँग्रेस नेत्याने प्रशांत किशोर यांच्यावर भाष्य केलं आहे.”प्रशांत किशोर यांच्याकडे काही जादूची कांडी नाही. त्यांना आपल्या पक्षाची संस्कृती आणि दृष्टिकोनाशी जुळवून घेणं देखील कठीण होऊ शकतं,” असे या नेत्याने म्हटले आहे. दरम्यान, अहमद पटेल यांच्या निधनानंतर मध्यंतरी अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवाची मालिका सुरू आहे. त्यामुळे पक्षाचं पुनरुज्जीवन करण्यात मदत करण्यासाठी अध्यक्षा सोनिया गांधी एका सल्लागारांचा शोध घेत आहेत.

काँग्रेसच्या कार्यशैलीबाबत नाराजी

प्रशांत किशोर यांचा देखील काँग्रेससोबतचा अनुभव फारसा समाधानकारक नव्हता. यापूर्वी त्यांनी पक्षावर आणि त्याच्या कार्यशैलीवर टीका केली होती. मे महिन्यात याबाबत प्रशांत किशोर म्हणाले होते कि, “काँग्रेस हा १०० वर्ष जुना राजकीय पक्ष आहे. त्यांची स्वतःची अशी काम करण्याची विशिष्ट पद्धत आहे. त्यामुळे, ते प्रशांत किशोर किंवा इतर कोणी सुचवलेल्या पद्धतींनुसार काम करण्यास तयार नाहीत. ते माझ्या कार्यशैलीनुसार काम करण्यास तयार होणार नाहीत.”

सर्वपक्षीय नेत्यांसोबत काम

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांनी सुरुवातीला भाजपसोबत काम केलं होतं. त्यानंतरते जेडीयूमध्ये सामील झाले आणि पक्षाचे उपाध्यक्ष झाले. तर उत्तर प्रदेशातील गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेससोबत काम केलं. त्यांनी पंजाबमध्ये पक्षाला मदत केली. ते मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे सल्लागार होते. याशिवाय त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी, दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत एमके स्टालिन, आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्यासोबत काम केलं आहे.