जनता दलाने भाजपशी फारकत घेतल्यानंतर उभय पक्षांमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना सुरुवात झाली असून भाजपने आपल्याच ज्येष्ठ नेत्यांची नाकेबंदी केली असल्याची तोफ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी येथे डागली. तर जनता दलाने आमच्या अंतर्गत कारभारात नाक खुपसू नये, असा सल्ला देऊन भाजपने नितीशकुमार यांना तसेच प्रत्युत्तर दिले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या मुद्दय़ावरून भाजपने लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यास अडगळीत टाकले असल्याची टीका नितीशकुमार यांनी केली. ज्यांनी फसवणूक करून आपल्याच ज्येष्ठ नेत्यांची नाकेबंदी केली आहे, त्यांना इतरांकडे बोट दाखविण्याचा अधिकारच नाही, असे नितीशकुमार यांनी भाजपच्या नेत्यांना सुनावले. जे आपल्याच नेत्यांचा आदर राखू शकत नाहीत आणि त्यांना अडगळीत टाकतात त्यांना आमच्यावर आरोपबाजी करण्याचाही अधिकार नसल्याचे नितीशकुमार यांनी बजावले.
मोदी यांना पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी नियुक्त करण्यात आल्यामुळे अडवाणी नाराज झाले आणि त्याचवेळी जनता दल (यु) रालोआमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झाली, असे नितीशकुमार यांनी सांगितले. तुमचे ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नाडिस यांचीही अवस्था अडवाणी यांच्यासारखीच झाली आहे काय, असा प्रश्न विचारला असता नितीशकुमार यांनी नकारार्थी उत्तर दिले. फर्नाडिस हे आजारी असून अंथरुणास खिळून आहेत आणि आम्ही नियमितपणे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटत असतो, असे त्यांनी नमूद केले. आमचा पक्ष नेहमीच ज्येष्ठांचा आदर करतो, आमची तशी परंपराच आहे, असा दावा नितीशकुमार यांनी केला.
आमच्या पक्षाने फसवणूक केली असल्याचा भाजपचा आरोप खोडून काढतानाच उलट आम्हालाच रालोआमधून बाहेर पडण्यास त्यांनी भाग पाडले, अशी टीका नितीशकुमार यांनी केली. भाजपसमवेत संबंध तोडून काढण्याचा निर्णय घिसाडघाईत घेण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सन २००२ मध्ये गुजरातला झालेल्या जातीय दंगलींनतर तुम्ही रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही, असा प्रश्न विचारला असता सरकारमध्ये काम करणाऱ्या मंत्र्याला शिष्टाचारानुसार सरकारवर टीका करता येत नाही, असे स्पष्टीकरण नितीशकुमार यांनी दिले.