आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी काश्मीर मुद्यावरून आपल्याच पक्षाचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे. सिद्धू यांना आपले मित्र इम्रान खान यांच्यामुळे टीका सहन करावी लागत आहे. त्यांनी आपल्या मित्राला समजावले पाहिजे, असा खोचक सल्ला त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर काश्मीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकजुट होऊन एक आराखडा तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

एकापाठोपाठ एक ट्विट करत त्यांनी सिद्धू यांना सल्ला देताना इम्रान खान यांना आव्हानही दिले. ते म्हणाले, पाकिस्तानचे श्रीमान पंतप्रधान कमऑन! हिम्मत दाखवा आणि हाफिज सईद व मसूद अझहर या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना भारताच्या स्वाधीन करा. असे केल्यास तुम्ही फक्त पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास सक्षम होणार नाही. उलट तुम्ही शांततेच्या नोबेल पुरस्काराचे प्रबळ दावेदारही ठराल.

त्यानंतरच्या आपल्या दोन ट्विटमध्ये त्यांनी नवज्योतसिंग सिद्धूंना टोला लगावला आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपले मित्र इम्रान यांना समजावून सांगितले पाहिजे. त्यांच्यामुळे सिद्धूंना टीका सहन करावी लागत आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सिद्धूंना टीकेचा सामना करावा लागला आहे. एका वाहिनीच्या परीक्षकपदावरूनही त्यांना हटवण्यात आले आहे.

आपल्या पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी मोदी समर्थकांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले, मला माहीत आहे की, मोदी भक्त मला ट्रोल करणार. पण मला याची पर्वा नाही. क्रिकेटपटू म्हणून इम्रान मला पसंत आहेत. पण सध्या ते मुस्लिम कट्टरपंथीय आणि आयएसआय समर्थित गटाला पाठिंबा देत आहेत. माझा यावर अजूनही विश्वास बसत नाही.