राज्यस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या २७ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावरून जाणारे ट्रक व अन्य वाहनांकडून जबरदस्तीने पैसा वसूल करणाऱ्या टोळीला पोलीस अधीक्षकच संरक्षण देत असल्याचा आरोप एका पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

धौलपूरचे उपअधीक्षक (वृत्त अधिकारी) दिनेश शर्मा यांनी पोलीस महानिरीक्षक (भरतपूर) यांना लिहिलेल्या पत्रात पोलीस अधीक्षक अजय सिंह यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. धौलपूर शहराच्या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर नऊ ठिकाणी हप्ता वसुलीसाठी १५ ते २० जण खाजगीरीत्या तैनात केले आहेत. ही टोळी ट्रक व इतर वाहनांकडून जबरदस्तीने वसुली करते व वसुलीचा हिस्सा पोलीस अधीक्षकांना पाठवला जातो, असा आरोप केला आहे.

एखाद्या वाहनचालकाने पैसे देण्यास नकार दिला, तर हे लोक त्याला मारहाण करतात व गाडी रोखून त्याला संबंधित पोलीस ठाण्यात बंद करतात. ही अवैध वसुली संघटितरीत्या पोलीस अधीक्षकांच्या निगराणीखाली केली जाते. यात अतिरिक्त पोलीस अधीक्षकही पूर्णपणे गुंतलेले आहेत. त्याचप्रमाणे निहालगंज, कोतवाली, सदर धौलपूरचे ठाणेप्रमुख व प्रभारीही या व्यवहारात अडकलेले आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे धक्कादायक आरोप करताना पोलीस अधिकाऱ्याने संबंधितांची नावे व मोबाईल फोन क्रमांकही नमूद केलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सागरपाडा पोलीस चौकीवर सर्वांत जास्त वसुली केली जाते. दररोज करण्यात आलेल्या वसुलीमधील निश्चित वाटा पोलीस अधीक्षकांना पाठवला जातो. याशिवायही अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. या आरोपांबाबत पोलीस अधीक्षकांची बाजू जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. विशेष म्हणजे प्रोबेशन काळात ते भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दोन वर्षे निलंबित राहिलेले आहेत.

पत्राबाबत चौकशी सुरू
पोलीस महानिरीक्षक (भरतपूर) भूपेंद्र सिंह यांनी या पत्राबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती दिली. पत्रात अनेक आरोप करण्यात आले आहेत, तसेच काही तथ्यांचाही उल्लेख केला आहे, त्यांची शहानिशा केली जात आहे. पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाबाबत माहिती देण्यात आली असून, कोणी अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध मुख्यालयाच्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.