News Flash

आता धोका Disease X चा; इबोला शोधणाऱ्या डॉक्टरने दिला करोनापेक्षाही भयंकर विषाणूच्या संसर्गाचा इशारा

जाणून घ्या नक्की काय आहे डिसीज एक्स?

प्रातिनिधिक फोटो

जग करोनाच्या संकटाला तोंड देत आहे. मागील वर्षभराहून अधिक काळापासून सुरु असणाऱ्या या संघर्षामध्ये आता अनेक देशांनी लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. असं असतानाच आता धोकादायक अशा इबोला विषाणूचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकाने संपूर्ण जगाला नवा इशारा दिला आहे. करोनापेक्षाही धोकादायक अशा विषाणूचा सामना करण्यासाठी जगाने तयार रहावं, असं मत वैज्ञानिक जीन-जॅक्स मुयेम्बे तामफूम यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलं आहे. जीन यांनी या आजाराला डिसीज एक्स (Disease X) असं म्हटलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये या आजाराचे रुग्ण असून कांगोमध्येही या आजाराने अनेक रुग्ण आढळून येत असल्याचा दावा जीन यांनी केलाय.

नक्की काय आहे डिसीज एक्स?

या नव्या संसर्गजन्य आजाराचं नाव प्राध्यापक जीन यांनी डिसीज एक्स असं ठेवलं आहे. हा विषाणू खूपच घातक असल्याचे सांगण्यात येतं. प्राध्यापक जीन यांनी सन १९७६ मध्ये इबोला विषाणूचा शोध लावला होता. “आज आपण अशा काळामध्ये जग आहोत जिथे नवीन विषाणू मानवासमोर येतील आणि ते मानवासाठी धोकादायक ठरतील,” असं मत जीन यांनी व्यक्त केलं आहे. भविष्यामध्ये येणारी संसर्गजन्य आजाराची साथ ही सध्याच्या करोनापेक्षाही भयंकर असेल असा आपला अंदाज असल्याचे प्राध्यापक जीन सांगतात. हा नवा विषाणू जास्त धोकादायक असण्याबरोबरच तो मोठ्याप्रमाणात नुकसान करणाराही ठरणार आहे, असंही जीन म्हणालेत. कांगोमधील इगेंडे येथे एका महिलेला अचानक रक्तस्त्राव आणि तापाची लक्षण जाणवू लागली. या महिलेची इबोला चाचणी करण्यात आली मात्र त्याचा निकाल नकारात्कम आला. ही महिला डिसीज एक्सची पहिली रुग्ण असल्याची भीती डॉक्टरांना आहे. हा आजार करोनाप्रमाणेच वेगाने पसरु शकतो. या विषाणूच्या संसर्गाने मरण पावणाऱ्यांची संख्या इबोलाने दगावणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा ५० ते ९० टक्के अधिक असू शकते अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केलीय.

जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते?

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार वैज्ञानिकांच्या माहितीनुसार सध्या डिसीज एक्स हा विषाणू काल्पनिक आहे. मात्र ज्या पद्धतीने या विषाणूचे वर्णन केलं जात आहे त्याच वेगाने त्याचा प्रसार होत असल्यास जगभरामध्ये त्या फैलाव होण्यापासून थांबवणे अंत्यंत कठीण असेल, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. प्राध्यपक जीन यांनी पहिल्यांदा या रहस्यमय विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या महिलेच्या रक्ताचा नमुना घेतला होता तेव्हा त्यांनी हे इबोलाचे प्रकरण असल्याचा म्हटेल होतं. सामान्यपणे इबोलाचा संसर्ग झाल्यानंतर रक्तस्त्राव होऊ लागतो आणि रुग्णाचा मृत्यू होतो. इबोलाचा विषाणू पहिल्यांदा जेव्हा सापडला होता तेव्हा यामबूकू मिशन रुग्णालयातील ८८ टक्के रुग्ण आणि ८० टक्के कर्मचाऱ्यांचा या विषाणूच्या संसर्गानेच मृत्यू झालेला. जीन यांनी जो नमुना घेतला होता तो बेल्जियम आणि अमेरिकेत संशोधनासाठी पाठवण्यात आला. तेथील संशोधनकांनी या नमुन्यातील रक्तामध्ये अळीच्या आकाराचे काही विषाणू असल्याचं आढळून आलं. आता जीन यांनी एकाकडून दुसऱ्याला संसर्ग होणारे अनेक आजार भविष्यात डोकं वर काढू शकतात, असा इशाराच दिलाय.

प्राण्यांपासून होत राहणार संसर्ग

मागील काही वर्षांपासून यल्लो फिव्हर, अनेक प्रकारचे इन्फ्युएन्जा, रेबीज आणि इतर काही विषाणुंचा प्राण्यांमधून मानवाला संसर्ग झालाय. यापैकी अनेक आजार हे उंदीर आणि किड्यांमुळे मानवी शरीरात दाखल झालेत. यापूर्वीही प्लेगची साथ जगामध्ये येऊन गेलीय. प्राण्यांची मूळ राहण्याची ठिकाणं नष्ट केली जात आहेत, प्राण्यांसंदर्भातील व्यापार झपाट्याने वाढत असल्याच्या दोन मुख्य कारणांमुळे प्राण्यांपासून मानवाला संसर्ग होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढल्याचा अंदाज तज्ज्ञ मंडळी व्यक्त करतात. नैसर्गिक निवारा नष्ट झाल्यास मोठे प्राणी नामशेष होऊन नष्ट होतील मात्र उंदीर, वटवाघुळं आणि किड्यांच्या माध्यमातून संसर्ग होईल. सार्स, मर्सआणि करोनासारख्या विषाणूंचा संसर्गही मानवाला प्राण्यांपासूनच झालाय. चीनमधील वुहान शहरामध्ये वटवाघुळाच्या माध्यमातून करोनाचा सर्वात प्रथम संसर्ग मानवाला झाल्याचे सांगण्यात येते. या विषाणूने जगभरातील लाखो लोकांचा जीव घेतला आहे.

दर तीन ते चार वर्षांनी नवा विषाणू, मुख्य कारण…

ब्रिटनमधील एडिनबर्ग विद्यापिठाच्या संशोधनानंतर दर तीन ते चार वर्षांच्या अंतरानंतर नवीन विषाणू जगभरामध्ये सापडत आहे. प्राध्यापक मार्क वूलहाऊस यांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी अनेक विषाणूंचा प्राण्यांमधून मानवामध्ये संसर्ग होतो. जंगली प्राण्यांचे मांस खाण्याचे प्रकार सुरु ठेवल्यास इबोला, करोनासारख्या विषाणूंचा मनवाला संसर्ग होत राहील. वुहानसारख्या ठिकाणी जिथे जिवंत प्राणी विकले जातात तिथे अशा संसर्गाचा धोका अधिक असतो. या प्राण्यांपैकी कोणत्या एखाद्या प्रण्यामध्ये डिसीज एक्सचा विषाणू असू शकतो अशी भीतीही प्राध्यापक मार्क यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 8:49 am

Web Title: disease x a new african virus the doctor who discovered ebola warns of deadly viruses yet to come scsg 91
Next Stories
1 नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं राष्ट्रवाद नव्हे – सचिन पायलट
2 पाकिस्तानात दहशतवाद्यांकडून ११ कोळसा खाण कामगारांची अपहरण करुन हत्या
3 असेही Side Effects… करोना कालावधीमध्ये दारुशी संबंधित आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ
Just Now!
X