फटाक्यांच्या दणदणाटानंतर राजधानी दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीमध्ये फटाके वाजवण्याची वेळ ठरवून दिली होती. परंतु, कोर्टाच्या या आदेशाचं दिल्लीसह सर्वच राज्यांमध्ये उल्लंघन झाल्याचं चित्र आहे. परिणामी दिल्लीवर प्रदूषित धुक्याची चादर पसरलेली आहे. गुरूवारी जारी झालेल्या वायू गुणवत्ता निर्देशांकानुसार (AQI) दिल्लीतील हवा प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे.


वायू गुणवत्ता निर्देशांकानुसार, दिल्लीच्या आनंद विहारमध्ये वायू प्रदूषणाचा स्तर 999 , चाणक्यपुरी येथे 459, मेजर ध्यानचंद नेशनल स्टेडियम येथे 999 (AQI) इतका नोंदवण्यात आला. प्रदूषणाचा हा स्तर धोक्याच्या पातळीच्या श्रेणीत येतो. कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. वायू प्रदूषणाचा त्रास केवळ दिल्लीकरांनाच नाही तर आसपासच्या इतर राज्यातील लोकांनाही होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत रात्री 8 ते 10 दरम्यान फटाके फोडण्याची वेळ ठरवली होती, मात्र लोकांनी याचं उल्लंघन केलं. संध्याकाळपासूनच अनेक ठिकाणी फटाके फोडण्यास सुरूवात झाली होती आणि रात्री उशीरापर्यंत फटाके फोडले जात होते अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली.