राजस्थानमध्ये हनी ट्रॅप रॅकेटमधील २१ वर्षाच्या तरुणीला ‘फेसबुक लाईव्ह’मुळे पकडण्यात यश आले आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये डीजे म्हणून काम करणाऱ्या या तरुणीने फेसबुक लाईव्ह केले आणि पोलिसांना तिचे लोकेशन समजले. राजस्थान पोलिसांच्या पथकाने तिला अटक केली आहे.

राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकाने हनी ट्रॅप प्रकरणातील एक मोठे रॅकेट उघडकीस आणले होते. या रॅकेटमध्ये शिखा तिवारी या २१ वर्षाच्या तरुणीचाही समावेश होता. राजस्थानमधील डॉ़क्टर, बिल्डर आणि उच्चभ्रू मंडळींना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवले जात होते. या मंडळींशी ओळख वाढवून रॅकेटमधील तरुणी त्यांच्यासोबत फिरायला जायच्या. यानंतर त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले जायचे.

राजस्थानमधील डॉक्टर सुनीत सोनी यांच्यावर शिखा तिवारी या तरुणीने बलात्काराचे आरोप केले होते. सोनी यांचे हेअर ट्रान्सप्लान्ट क्लिनीक होते. शिखा तिवारीने उपचाराच्या बहाण्याने सुनीत सोनी यांच्याशी ओळख वाढवली. यानंतर दोघेही पुष्कर येथे फिरायला गेले. पुष्करवरुन परतल्यावर शिखा तिवारीने सुनीतवर बलात्काराचे आरोप केले. याप्रकरणात सुनीत तब्बल ७८ दिवस तुरुंगात होता. सुनीतच्या सुटकेसाठी त्याच्या कुटुंबीयांनी शिखाला तब्बल १ कोटी रुपये दिले होते. यानंतर शिखाने आरोप मागे घेतले. तुरुंगातून बाहेर पडल्यावर डिसेंबर २०१६ मध्ये सुनीतने राजस्थान पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

राजस्थान पोलिसांनी केलेल्या तपासात हनी ट्रॅपचे मोठे रॅकेटच समोर आले. याप्रकरणी आत्तापर्यंत ३३ जणांना अटक झाली होती. यात ५ तरुणींचा समावेश होता. हनी ट्रॅप प्रकरणातील या टोळीने आत्तापर्यंत २० कोटी रुपये उकळल्याचे समोर आले होते.

सुनीत सोनी यांना ब्लॅकमेल करणारी शिखा तिवारी डिसेंबर २०१६ पासून पोलिसांना चकवा देत होती. शिखा जयपूर आणि अन्य शहरांमध्ये ‘डीजे अदा’ यानावाने ओळखली जाते. ती मुंबईतील एका हॉटेलमध्ये डीजे म्हणून सहभागी झाली होती. या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्हदेखील झाले होते. हा प्रकार राजस्थान पोलिसांना समजला आणि त्यांना शिखाचे लोकेशन ट्रेस झाले. यानंतर पोलिसांनी शिखाला अटक केली.