मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात आज एक समान धागा दिसून आला. हा धागा होता युद्धाचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना आपल्या देशात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धापेक्षाही बिकट परिस्थिती आज करोनामुळे निर्माण झाली असा उल्लेख केला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज राज्याला संबोधित करत असताना उद्धव ठाकरे यांनीही व्हायरससोबतचं युद्ध असा उल्लेख केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात हा समान धागा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

काय म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी?

आपल्या देशावर अशी परिस्थिती पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही आली नव्हती. अशावेळी आपण एकजूट होऊन करोना व्हायरसचा सामना केला पाहिजे. आपल्या या युद्धात संकल्प आणि संयम आपल्याला कामाला येणार आहे. कारण हे एका व्हायरस सोबतचं युद्ध आहे. १३० कोटी भारतीयांचा मला असलेला पाठिंबा हीच आपली ताकद आहे. करोना व्हायरसशी दोन हात करताना तुम्ही जी खबरदारी आत्तापर्यंत घेतली त्यासाठी मी तुमचं कौतुक करतो. यापुढे अशीच खबरदारी आपल्याला घ्यायची आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

आपले युद्ध हे व्हायरसशी आहे. गेले काही दिवस एक वेगळं जागतिक युद्ध  आपला देश आणि जग लढतं आहे. मी आपणा सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो कारण ज्या सूचना आम्ही सरकार म्हणून तुम्हाला दिल्या आहेत त्या तुम्ही नुसत्या पाळत नाही तर त्याबद्दल आम्हाला सहकार्यही करत आहात. हे युद्ध आहे आणि युद्धात तुमच्या सगळ्यांचं सहकार्य ही आपली ताकद आहे.

आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचं आवाहन केलं आहे. येत्या रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत स्वयंशिस्तीने कर्फ्यू पाळयचा आहे. करोनासारख्या संकटाला देश कशाप्रकारे सामोरा जातो ते आपण दाखवून द्यायचं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या भाषणात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात व्हायरससंगे युद्ध सुरु आहे हा समान धागा दिसून आला.