सोमवारी सर्व वैद्यकीय सेवा बंद राहणार

कोलकात्यामध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधात देशभरातील डॉक्टरांनी आंदोलन केले. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) या संघटनेने शुक्रवारपासून तीन दिवस निषेध आंदोलन सुरू केले असून सोमवार १७ जूनला आपातकालीन वैद्यकीय सेवा वगळता देशभरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद राहणार असल्याचे संघटनेने जाहीर केले.

कोलकाता येथे रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधात हे आंदोलन सुरू झाले आहे. रुग्णालयात हिंसाचार करणाऱ्यांना किमान सात वर्षांचा तुरुंगवास देणारा कायदा करावा, अशी मागणीही ‘आयएमए’ने केली आहे. महाराष्ट्रातील जवळपास साडे चार हजार निवासी डॉक्टर आणि पाच हजार इंटर्नशीपचे विद्यार्थी शुक्रवारी सकाळी आठ ते पाच वेळेत पुकारलेल्या काम बंद आंदोलनात सहभागी झाले होते.

मुंबईतील केईएम, नायर, शीव, जे.जे, सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयात वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व प्राध्यापक रुग्णालयात उपस्थित असल्याने रुग्णसेवा उशीरा का होईना परंतु सुरू होत्या. विशेष  म्हणजे शुक्रवारी जागतिक रक्तदान दिन असल्याने आंदोलनकर्त्यां डॉक्टरांनी काही रुग्णालयांत आवर्जून रक्तदानही केले!

तातडीच्या नसलेल्या काही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तरीही दिवसभरात ८० शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. नायर रुग्णालयात दिवसभरात ८ मुख्य शस्त्रक्रियांसह ३ प्रसूती पार पडल्या, असे नायरचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

रुग्णांना या आंदोलनाबाबत कोणतीही कल्पना नसल्याने नेहमीप्रमाणेच अनेक रुग्णालयांतील बाह्य़रुग्ण विभागांत गर्दी होती. शीव रुग्णालयातही आपातकालीन विभागामध्ये काही प्रमाणात दिवसभर धावपळ झाली. तरीही वरिष्ठ डॉक्टरांनी योग्य प्रकारे परिस्थिती हाताळली, असे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. दरम्यान, कनिष्ठ डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाबाबत कोणताही अंतरिम आदेश देण्यास कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. डॉक्टरांनी संप मागे घेऊन सेवेत रुजू व्हावे, यासाठी राज्य सरकारने त्यांचे मन वळवावे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

आंदोलनकर्त्यांचे रक्तदान!

शुक्रवारी जागतिक रक्तदान दिन असल्याने आंदोलनकर्त्यां डॉक्टरांनी काही रुग्णालयांत आवर्जून रक्तदानही केले. केईएममध्ये आयोजित शिबिरात १२० डॉक्टरांनी रक्तदान केले. शीव रुग्णालयात ७२ डॉक्टरांनी रक्तदान केल्याची माहिती मार्डचे डॉ. प्रशांत चौधरी यांनी सांगितले.