अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही करोनाची बाधा झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिल्यानंतर आता डॉक्टरांनी ट्रम्प यांना मेलेनिया यांच्यापेक्षा अधिक धोका असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प हे ७४ वर्षांचे असून त्यांचे वय आणि वजन पाहता त्यांना करोनाचा अधिक त्रास होऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. वैद्यकीय व्याख्येनुसार ट्रम्प हे स्थूल असल्याने त्यांना आजारपणामुळे अधिक धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीजेस अ‍ॅण्ड प्रिवेन्शनच्या माहितीनुसार वय वर्ष ६५ ते ७४ गटातील रुग्णांना करोनामुळे रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता ही पाच टक्क्यांनी अधिक असते. तर १८ ते २९ वयोगटातील व्यक्तींपेक्षा ६५ ते ७४ वयोगटातील व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणे ९० टक्क्यांनी अधिक असते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

एप्रिल महिन्यामध्ये ट्रम्प यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होता. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार त्यावेळी ट्रम्प यांचे वजन २४४ पौंड्स म्हणजेच ११० किलोहून अधिक होतं. ट्रम्प यांची उंची ६.३ फूट असल्याने त्यांचे बॉडी मास्क इंडेक्स ३०.५ इतके आहे. म्हणजेच ते थोडे स्थूल आहेत. याशिवाय अमेरिकेतील काही आघाडीच्या आरोग्य केंद्रांमधील संशोधनानुसार करोनामुळे पुरुषांच्या मृत्यूची टक्केवारी ही महिलांच्या तुलनेत अधिक आहे. या तीन गोष्टींव्यतीरिक्त ट्रम्प यांना इतर काही वैद्यकीय समस्या आहेत का यासंदर्भातील माहिती उपलब्ध नाहीय. मात्र असा समस्या असल्यास आधीच हाय रिस्क ग्रुपमध्ये असलेल्या ट्रम्प यांना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. ट्रम्प यांच्या काही महिन्यांपूर्वीच्या आरोग्य अहवालानुसार त्यांना रक्तदाबाचा त्रास आहे. मात्र ट्रम्प यांना कॅन्सर, यकृताशी संबंधित आजार, मधुमेह आणि करोनाचा अधिक गंभीर परिणाम करणाऱ्या इतर आरोग्य समस्या नसल्याचे स्पष्ट आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना करोनाचा धोका कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मेलेनिया या ५० वर्षांच्या आहेत. त्या करोना हाय रिस्क म्हणजेच सर्वाधिक धोका असणाऱ्या वयोगटामध्ये येत नाहीत. मात्र १८ ते २९ वयोगटातील व्यक्तींपेक्षा ५० ते ६४ वयोगटातील व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणे ३० टक्क्यांनी अधिक असते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागण्याची शक्यताही तिप्पटीने अधिक असते. मेलेनिया या वयाच्या ५० व्या वर्षीही आपल्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतात. डाएट आणि व्यायामावर त्यांचा भर असल्याने त्या तंदरुस्त आहेत. २०१८ साली मेलेनिया यांच्यावर यकृतासंदर्भातील समस्येमुळे एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार ही शस्त्रक्रीया यकृताबद्दलची होती. याव्यक्तीरिक्त अधिक माहिती देण्यात आलेली नव्हती. यकृतासंदर्भातील समस्या असणाऱ्यांना कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना करोनाचा धोका अधिक असतो. मात्र मेलेनिया यांना नक्की काय आजार होता हे स्पष्ट नसल्याने त्यांना याचा अधिक त्रास होईल का हे सांगता येणं कठीण आहे.