News Flash

कट्टरतावादी मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशबंदी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आदेशावर स्वाक्षरी

| January 29, 2017 01:34 am

कट्टरतावादी मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशबंदी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आदेशावर स्वाक्षरी

मुस्लीम बहुल देशातील कट्टरतावादी (मूलतत्त्ववादी) लोकांना अमेरिकेत येण्यास मज्जाव करतानाच सीरियातील निर्वासितांना पुढील सूचनेपर्यंत प्रवेश न देण्याच्या आदेशावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. मूलतत्त्ववादी मुस्लीम दहशतवाद्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांनी हा आदेश जारी केला. इराण, इराक, सीरिया, येमेन, सुदान, लिबिया, सोमालिया या देशांच्या लोकांना ३० दिवस प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरेबिया या देशातील लोकांची कसून तपासणी केली जाईल असे सांगण्यात आले. पेंटॅगॉन येथे कार्यात्मक आदेशावर स्वाक्षरी करताना ट्रम्प यांनी सांगितले की, मूलतत्त्ववादी इस्लामी दहशतवाद्यांना अमेरिकेत येऊ द्यायचे नाही, आम्हाला ते येथे नको आहेत असे स्पष्ट केले. प्रोटेक्शन ऑफ द नेशन फ्रॉम फॉरेन टेररिस्ट एंट्री इन टू द युनायटेड स्टेट्स या शीर्षकाच्या आदेशावर त्यांनी स्वाक्षरी केली. अमेरिकेत ९/११ च्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना अमेरिकेपासून दूर ठेवण्यात अपयश आले आहे असे आदेशात म्हटले आहे.

११ सप्टेंबरनंतर अनेक परदेशी वंशाच्या लोकांना दहशतवादी गुन्ह्य़ात दोषी ठरवले गेले आहे. अभ्यागत, विद्यार्थी व शरणार्थी व्हिसा मिळवलेल्या काही लोकांचा त्यात समावेश आहे. इराण, इराक, सीरिया, सुदान, लिबिया, येमेन, सोमालिया यांचा त्यात सहभाग आहे. मुस्लीम लोकांचे अमेरिकेत होणारे स्थलांतर कमी करण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले होते त्याची पूर्तता त्यांनी आठवडाभरातच केली आहे.

अमेरिकेला पाठिंबा असलेल्या व आमच्या लोकांवर प्रेम करणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल. जे लोक आमच्या सैनिकांसाठी व जनतेसाठी धोकादायक आहेत त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, आम्ही ९/११ चा हल्ला विसरू शकत नाही त्याचबरोबर ज्यांनी पेंटॅगॉनमध्ये प्राण गमावले त्यांनाही विसरू शकत नाही, त्यांचा सन्मान आम्ही शब्दांनी नव्हे तर कृतीने करणार आहोत त्यामुळेच हा आदेश जारी करीत आहोत, असे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस व उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी सांगितले. अनेक देशात युद्ध व संघर्ष, नागरी युद्ध सुरू आहे त्याचा फायदा घेऊन दहशतवादी अमेरिकेत घुसू शकतात अशी भीती आदेशात व्यक्त केली आहे.

अमेरिका सुरक्षित राहावी यासाठी या देशात प्रवेश करणाऱ्यांचा दृष्टिकोन हा शत्रुत्वाचा नसावा, आमच्या राज्यघटनेतील तत्त्वांविरोधात असलेल्यांना आम्ही स्थान देणार नाही, हिंसक विचार येथे चालणार नाहीत, जे लोक ऑनर किलिंग करतात, महिलांविरोधात गुन्हे करतात, विद्वेष पसरवतात त्यांनाही आम्ही प्रवेश देणार नाही असे आदेशात म्हटले आहे.

  • आता अमेरिकी शरणार्थी कार्यक्रम या आदेशामुळे आपोआप बंद झाला आहे. ज्या देशांची नावे ट्रम्प प्रशासनाने घेतली आहेत त्यांच्या शरणार्थीना आता किमान सुरुवातीला १२० दिवस प्रवेश मिळणार नाही.
  • काही देशांनी जर त्यांचे अमेरिकी नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करणारे जे लोक आहेत त्यांची माहिती दिली नाही, तर प्रतिबंधित देशांची यादी वाढू शकते. ख्रिश्चन ब्रॉडकास्ट नेटवर्कला ट्रम्प यांनी सांगितले की, ख्रिश्चन शरणार्थीना प्राधान्य दिले जाईल त्यांना मदत केली जाईल. त्यांना सध्या वाईट वागणूक मिळते आहे. सीरियात तुम्ही ख्रिश्चन असाल तर अमेरिकेत येऊ शकत नाही, पण मुस्लीम असाल तर लगेच प्रवेश मिळतो अशी परिस्थिती आहे, तिथे ख्रिश्चन लोकांची मुंडकी उडवली जात आहेत.
  • इराण, इराक, सीरिया, येमेन, सुदान, लिबिया, सोमालिया या देशांच्या लोकांना ३० दिवस प्रवेश बंदी.
  • कौन्सिल ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेशन्स ही संस्था अध्यक्षांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देणार.
  • आदेशावर टीका करणाऱ्यांच्या मते बंदी घातलेल्या सहा देशांच्या नागरिकांचे अमेरिकेत एकही दहशतवादी कृत्य नाही.
  • शरणार्थी प्रवेश कार्यक्रम १२० दिवस बंद
  • अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरेबिया या देशातील लोकांची कसून तपासणी.

 

  • हॉलोकास्ट मेमोरियल डे च्या दिवशी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. मी चुकत नसेन तर मुस्लिमांवर बंदी असा त्याचा अर्थ आहे. छळछावण्यात जो मानवीसंहार झाला त्यावेळी अ‍ॅनी फ्रँकला शरणार्थी म्हणून अमेरिकेत प्रवेश मिळाला नव्हता. आपण इतिहासाची पुनरावृत्ती करू शकत नाही. सिनेटर कमला हॅरिस, डेमोक्रॅट
  • ट्रम्प यांनी मुस्लिमांना बंदी घालण्याचा जो आदेश काढला आहे त्यामुळे आपले हृदय विदीर्ण झाले.मलाला युसूफझाई, नोबेल विजेती
  • अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे आदेश काढीत आहेत त्याबाबत चिंता वाटते. अनेक अमेरिकनांप्रमाणे मीही स्थलांतरित वंशाचा आहे. मार्क झकरबर्ग, फेसबुकचे संस्थापक

 

असुरक्षित कुटुंबाकडे ट्रम्प यांनी पाठ फिरवली- मलाला

लंडन : सात मुस्लीम बहुल देशातील लोकांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्याच्या आदेशावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी के ल्याने आपले मन विदीर्ण झाले, असे नोबेल विजेती पाकिस्तानी शिक्षण कार्यकर्ती मलाला युसूफझाई हिने म्हटले आहे. आधीच बचावहीन व असुरक्षित असलेल्या लोकांकडे ट्रम्प यांनी पाठ फिरवली आहे असेही तिने सांगितले. तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून वाचलेल्या युसूफझाई हिने सांगितले की, ट्रम्प यांनी हिंसाचारामुळे निर्वासित झालेली मुले, त्यांच्या माता, पिता यांना दारे बंद केली आहेत. अमेरिकेचा इतिहास निर्वासितांचे स्वागत करण्याचा आहे, स्थलांतरितांना तेथे प्रवेश मिळत होता. या स्थलांतरित लोकांनी अमेरिकेच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलला, जीवन जगण्याच्या संधीच्या बदल्यात कठोर परिश्रमांची त्यांची तयारी नेहमीच दिसून आली. गेली सहा वर्षे सीरियातील यादवीत मुले भरडली जात आहेत. त्यांची काही चूक नाही पण आता त्यांनाही शिक्षा होणार आहे.

 

लष्कराच्या फेरबांधणीचे ट्रम्प यांचे आदेश

वॉशिंग्टन : अमेरिकी लष्कराचे सामथ्र्य वाढवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची मजबूत फेरबांधणी करण्याचे आदेश दिले आहेत. यात लष्करी सामग्रीचे आधुनिकीकरण, प्रशिक्षणात सुधारणा व संरक्षण तरतुदीत वाढ या बाबींचा समावेश आहे. या बाबतच्या कार्यात्मक आदेशावर ट्रम्प यांनी पेंटॅगॉनला दिलेल्या पहिल्याच भेटीत स्वाक्षरी केली असून ओबामा प्रशासनाने ज्या लष्कराकडे दुर्लक्ष केले त्याची फेरबांधणी आपण करू असे ते म्हणाले.

 

अमेरिका स्थलांतरितांची – मार्क झकरबर्ग

सानफ्रान्सिको : अमेरिका हा स्थलांतरितांचा देश आहे व त्याचा अभिमान असला पाहिजे, असे मत फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मूलतत्त्ववादी मुस्लिमांना अमेरिका प्रवेशबंदी करण्याच्या आदेशावर व्यक्त केले. त्यांनी फेसबुकपेजवर लिहिले आहे की, तुमच्यासारखाच मीही आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी अलीकडेच जो आदेश काढला आहे त्याचे परिणाम काय होतील याची चिंता वाटते, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2017 1:34 am

Web Title: donald trump muslim ban in us
Next Stories
1 नोटाबंदी हे दिशाहीन क्षेपणास्त्र
2 जिओला रोखण्यासाठी व्होडाफोन-आयडिया एकत्र येण्याची शक्यता
3 वाजपेयींच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा; हवाई दलाने उडवले होते पाकिस्तानी बंकर
Just Now!
X