अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सहकारी आणि सल्लागारांकडे पद सोडण्याआधी एखाद्या विमानतळाला स्वत:च नाव देता येईल का यासंदर्भात विचारणार केली आहे. यासंदर्भातील माहिती या प्रकरणाशी दोन संबंधित व्यक्तींनी डेली बिस्टला दिल्याचे वृत्त बिझनेस इनसायडरने दिलं आहे. एखाद्या विमानतळाचं नाव बदलून त्याला स्वत:च नाव देण्यासाठी कोणकोणत्या कागपत्रांची गरज लागेल यासंदर्भात ट्रम्प यांनी आपल्या सल्लांगारांकडून माहिती मागवली आहे. सर्वात आधी ट्रम्प यांनी स्वत:च्या सन्मानार्थ एखाद्या विमानतळाचं नामकरण करण्यासंदर्भातील सल्ला २०१८ साली मागितला होता असंही या सुत्रांनी म्हटलं आहे.

ट्रम्प हे लवकरच राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार होणार असून नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रं हाती घेणार आहेत. २० जानेवारीला बायडेन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र पदभार सोडण्यापूर्वी आपल्या कामाची दाखल आपण पदावरुन पायउतार झाल्यानंतरी घेण्यात यावी यासाठी ट्रम्प यांच्या डोक्यात विमानतळाला स्वत:चं नाव देण्याचा विचार सुरु असल्याचे समजते. व्हाइट हाऊसचे प्रसारमाध्यम सचिव असणाऱ्या जेड डेरी यांनी अशाप्रकारचा कोणताही संवाद झाला आहे की यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्यांनी मियामि हेरार्ल्डला “आम्ही खासगीत झालेल्या चर्चेसंदर्भात वक्तव्य करु शकत नाही,” असं म्हटलं आहे.

ट्रम्प यांचं नाव कोणत्या विमानतळाला देण्यात येणार याबद्दल कोणताही ठोस माहितीसमोर आली नसली तरी फ्लोरिडामधील रिपब्लिकन नेत्याने यासंदर्भात एक सल्ला दिल्याचे वृत्त आहे. फ्लोरिडामध्ये रिपब्लिकन पक्षाचे उपसचिव असणाऱ्या ख्रिश्चन झीगलर यांनी पाम बीच इंटरनॅशनल एअरपोर्टला ट्रम्प इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव देण्याचा सल्ला दिलाय. सन सेंटीनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ख्रिश्चन यांनी “असं नामकरण झाल्यास दक्षिण फ्लोरिडामधील माजी राष्ट्राध्यक्षांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असेल,” असं म्हटलं आहे. या विमानतळावर ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष असताना एअरफोर्स वन हे कितीवेळा आलं यासंदर्भातही माहिती दिली. ख्रिश्चन यांनी ट्रम्प यांना एक सल्लाही दिला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या मार-ए-लागो क्लबजवळ एक प्रेसिडेंशियल लायब्रेरी उभारावी असं ख्रिश्चन म्हणाले आहेत. याचसोबत ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुलगी इवांकासहीत ट्रम्प यांच्या कुटुंबातील काही सदस्य फ्लोरिडामध्ये स्थायिक होण्यासंदर्भातील शक्यता व्यक्त करणारे वृत्तही समोर आलं आहे. ट्रम्प कुटुंबीय पाम बीचवरील घरामध्ये स्थायिक होण्याचा विचार करत असले तरी याला ट्रम्प यांच्या या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्यांचा विरोध असल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिलं आहे.

अशाप्रकारे राष्ट्राध्यक्षांच्या नावाने विमातळाचे नामांतर करणे काही नवीन गोष्ट नाही. व्हर्जिनियामध्ये रोनाल्ड रेगन वॉशिंग्टन नॅशनल एअरपोर्ट आहे. न्यूयॉर्कमधील एका प्रसिद्ध विमानतळाला जॉन एफ. केनडी यांचं नाव देण्यात आलं आहे. अर्कांन्सास येथील लिटील रॉकमधील विमानतळाला नुकतेच बिल अ‍ॅण्ड हिलरी क्लिंटन नॅशनल एअरपोर्ट असं नाव देण्यात आलं आहे.