ई-मेल प्रकरणात गुन्हेगारी स्वरूपाची चौकशी सुरू असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा देऊन अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी चुकीच्या व्यक्तीचे समर्थन केले आहे, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की, क्लिंटन यांच्याशी नोव्हेंबरच्या निवडणुकीत सामना करण्यास आपली तयारी आहे. यंदाच्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात मतदान होणार आहे. तुम्ही अध्यक्ष असताना गुन्हेगारी चौकशी सुरू असलेल्या महिलेला उमेदवारीसाठी पाठिंबा कसा देऊ शकता, यातून देश असा असावा असेच तुम्हाला म्हणायचे आहे काय, असा सवाल ट्रम्प यांनी व्हर्जिनियातील रिचमंड येथील सभेत केला. ओबामा यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा दिल्यानंतर ट्रम्प यांची पहिलीच सभा होती. क्लिंटन यांनी भ्रष्टाचार केला त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवणे हा लोकांवर अन्याय आहे. क्लिंटन फाउंडेशनला देणग्या दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळावर भारतीय अमेरिकी व्यक्ती राजीव फर्नाडो यांची नेमणूक क्लिंटन यांनी केली असा आरोप ट्रम्प यांनी केला. क्लिंटन यांना निवडणूक लढवू देऊ नये असे मला वाटते, पण त्यांच्याशी लढायचा विश्वास आपल्याकडे आहे असे ते म्हणाले.