जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज देशभरातल्या मीडियाला संबोधून एक आवाहन केले. ‘काश्मिरी जनतेबाबत देशात रोष उत्पन्न करू नये’ अशी विनंती या आवाहनाच्या माध्यमातून त्यांनी केली. त्याचसोबत त्या काश्मिरी तरूण-तरूणींच्या मागेही ठामपणे उभ्या राहिल्या. “सगळेच तरूण-तरूणी दगडफेक करत नाहीत. काही समाजकंटकांचं हे काम आहे. त्यामुळे काश्मीरमधल्या सगळ्याच तरूणांना नावं ठेवणं योग्य नाही” असं त्यांनी म्हटलं. त्यांनी ही प्रतिक्रिया ‘एएनआय’ला दिली. काश्मीरमध्ये हंदवाडामध्ये २० विद्यार्थी-विद्यार्थिनी सुरक्षा दलांशी भि़डल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी ही प्रतिक्रिया दिली.

जम्मू आणि काश्मीरमध्ये अलीकडे दगडफेकीच्या घटना खूपच वाढल्या आहेत. गेल्या वर्षी दहशतवादी बुरहान वानीचा सुरक्षा दलांनी खात्मा केल्यानंतर कितीतरी महिेने जम्मू काश्मीरमधलं वातावरण तंग होतं. सततच्या दगडफेकीमुळे तिथल्या सुरक्षा जवानांची कुचंबणा होते आहे. अनेकदा त्यांना समाजकंटकांकडून प्रवृत्त केलं जातं. या सगळ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत काश्मिरी जनतेबद्दल देशवासीयांच्या मनात काही रोषाची भावना निर्माण होऊ देऊ नका. अशी विनंती मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे

जम्मूमध्ये बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमनं उधळली. याआधी ‘काश्मीर प्रश्न जर कोणी सोडवू शकत असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदीच’ असं त्या म्हणाल्या होत्या. जम्मूमध्ये बोलताना त्यांनी पंतप्रधानांच्या. लाहोरभेटीचा उल्लेख करत ‘ही पंतप्रधान मोदी यांच्या ताकदीची निशाणी आहे.’ असं त्या म्हणाल्या